भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:30 AM2018-07-21T06:30:24+5:302018-07-21T06:31:12+5:30

भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना शुक्रवारी विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये ८५ महिला, १ पुरुष यांचा समावेश असून कैदी महिलेच्या एका चार महिन्यांच्या बाळालाही विषबाधा झाली आहे.

Poisoning to 86 prisoners in Byculla jail | भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना विषबाधा

भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना विषबाधा

Next

मुंबई : भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना शुक्रवारी विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये ८५ महिला, १ पुरुष यांचा समावेश असून कैदी महिलेच्या एका चार महिन्यांच्या बाळालाही विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दूषित अन्न, पाणी अथवा पालिकेकडून प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात आलेल्या गोळ्यांमधून ही बाधा झाल्याचा संशय कारागृह विभागाला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल. नागपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भायखळा कारागृहात ३९९ पुरुष आणि ३१२ महिला कैदी आहेत. सकाळी १० आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना जेवण दिले जाते. पुरुष कैद्यांपैकी एकाला कॉलराची लागण झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुरुवारी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कारागृहातील कैद्यांना डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या. जेवणानंतर ही गोळी सर्वांना घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
गुरुवारी संध्याकाळी गोळी घेतल्यानंतर काही महिलांनी त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली. काही महिलांना अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृहाच्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. शुक्रवारी पहाटे महिला कैद्यांच्या तक्रारी वाढल्या. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. कारागृहातील पाणी, अन्न, तसेच प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात आलेल्या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालातून विषबाधेचे कारण स्पष्ट होईल. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले.
त्या १० मिनिटांमुळे ६३० कैदी वाचले
कारागृहातील कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सर्वांना डॉक्सीसायक्लिन ही गोळी देण्यात आली. गोळी दिल्यानंतर १० मिनिटानेच कारागृहातील कर्मचारी धावत आले. त्यांनी गोळी घेऊ नका, असा सल्ला दिला. त्यामुळे अन्य कैदी आणि कर्मचाºयांनी त्या गोळ्या घेतल्या नाहीत. त्यामुळेच अन्य ६३० कैदी या बाधेपासून वाचल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
इंद्राणीला विषबाधा नाही
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील याच कारागृहात आहे. या प्रकरणानंतर सर्वप्रथम तिचेच नाव चर्चेत आले. रुग्णालय आणि कारागृहातही तिचा शोध सुरू झाला. मात्र, दुपारनंतर तिला याची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
>४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली
शुक्रवारी सकाळी ९.४० वाजता पहिला रुग्ण जे. जे.मध्ये दाखल झाला. त्यानंतर, दुपारी १.३० पर्यंत रुग्ण दाखल झाले. एकूण ८५ महिला कैदी रुग्ण आहेत. त्यात एका कैद्याच्या चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे, तर २४ व २६ आठवड्यांच्या दोन गर्भवतींचा समावेश आहे. आता या रुग्णांची प्रकृती स्थिर असून, दोन आपत्कालीन कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या महिला कैदी रुग्णांना झालेली बाधा दूषित अन्न किंवा पाण्यातून झाली असण्याची शक्यता आहे. या सर्व रुग्णांच्या रक्त, मूत्र, सोनोग्राफी व एक्स-रे अशा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालातून नेमके कारण स्पष्ट होईल. या सर्व रुग्णांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
- डॉ. मुकुंद तायडे, जे. जे. रुग्णालय, प्रभारी अधिष्ठाता.

Web Title: Poisoning to 86 prisoners in Byculla jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग