2019 च्या निवडणुकीत भाजपाला मिळणार 300+ जागा, पियुष गोयल यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 12:12 PM2018-04-11T12:12:14+5:302018-04-11T12:12:14+5:30

लोकसभेच्या निवडणुकीला आता अवघ्या वर्षभराचा अवधी राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपानेही केंद्रातील आपली सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला तब्बल...

Piyush Goyal said that the BJP will win 300 Seats in 2019 elections | 2019 च्या निवडणुकीत भाजपाला मिळणार 300+ जागा, पियुष गोयल यांचा दावा

2019 च्या निवडणुकीत भाजपाला मिळणार 300+ जागा, पियुष गोयल यांचा दावा

Next

मुंबई -  लोकसभेच्या निवडणुकीला आता अवघ्या वर्षभराचा अवधी राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपानेही केंद्रातील आपली सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला तब्बल 300 हून अधिक जागा मिळतील, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी दोन तृतियांश बहुमतासह सत्तेत पुनरागमन करेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपाचे खजिनदार पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. 
मंगळवारी झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018' या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना 'महाराष्ट्र भूषण' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले..'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. 
त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिबांग यांनी पियुष गोयल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये दिबांग यांनी रेल्वेमंत्र्यांवर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतचा अंदाज विचारला असता गोयल म्हणाले, " 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा सत्तेवर येईल. पुढील वर्षीह होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला 300 जागा मिळतील, तर मित्रपक्षांच्या जागा मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतियांश एवढे प्रचंड बहुमत मिळेल." 
निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या उधळपट्टीविषयीसुद्धा गोयल यांना विचारणा करण्यात आली. पुढच्या निवडणुकीसाठी भाजपाला तब्बल 34 हजार कोटींची गरज पडेल, अशी चर्चा असल्याचा प्रश्न दिबांग यांनी केला असता, गोयल यांनी हा आरोप खोडून काढला."पुढील निवडणुकीत 34 हजार कोटी रुपये लागतील, हा आरोप खोटा आहे. एवढा पैसा खर्च करायचा झाल्यास प्रत्येक मतदारसंघावर तब्बत  80 कोटी रुपये खर्च होतील, अशा खर्चामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडू शकते, असे ते म्हणाले. 

Web Title: Piyush Goyal said that the BJP will win 300 Seats in 2019 elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.