बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका!

By Namdeo Kumbhar | Published: January 30, 2018 09:55 AM2018-01-30T09:55:14+5:302018-01-30T14:36:21+5:30

बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलीय. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलंय. एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या.

A phone call from the bank? ... be careful | बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका!

बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका!

googlenewsNext

मुंबई - बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलीय. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलंय. एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या. अशा प्रकारचा फोन तुम्हाला आला की समजून जा तुमची गाठ सायबर गुन्हेगारांशी पडलीय. अशा फोनवर विश्वास ठेवून सध्या अनेक कार्डधारकांना ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या घटनांना उत आला आहे. विशेष म्हणजे अशी फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये उच्चशिक्षितांचाही समावेश आहे. म्हणूनच ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांनी सावधानता बाळगली पाहिजे. अशा कॉलपासून सावध राहायला हवं. कारण कोणत्याही बँकेतून तुमच्या खात्याची माहिती विचारण्यासाठी असा फोन कधीच येत नाही.

नोटाबंदीनंतर सर्वत्र कॅशलेस व्यवहाराचं महत्त्व वाढलं आहे. नागरिकांनीही कॅशलेस व्यवहाराला पसंती दिली आहे. मात्र, बँक खाते हॅक करून, एटीएम क्लोनिंग करून ग्राहकांच्या खात्यावरील रक्कमच गायब होऊ लागले आहेत. म्हणूनच जाणून घ्या फसवण्याच्या पद्धती अन् उपायांबद्दल...

फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती - 

  • पद्धत क्रमांक 1 -  मोबाइलवर एक कॉल येतो. बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर एटीएम किंवा डेबीट कार्डची माहिती विचारली जाते. एटीएम व डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून खात्याची माहिती घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांत तुमचे कार्ड पुन्हा सुरू होईल, असे सांगून फोन बंद केला जातो. काही वेळातच आपल्या खात्यातून हजारो रूपये लंपास झाल्याची माहिती मिळते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते.
  • पद्धत क्रमांक 2 - क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकाची क्रेडिट लिमिट ठरविण्यात आलेली असते. अशा ग्राहकांचे मोबाइल नंबर हे सायबर गुन्हेगार मिळवितात. याआधारे ग्राहक कोणत्या शहरात आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय हे शोधून काढतात. त्यानंतर ग्राहकाशी संपर्क साधून क्रेडिट कार्ड कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून क्रेडिट लिमिट वाढविण्यात येत असल्याचे सांगतात. त्यासाठी कंपनीचा माणूस तुमच्याकडे येईल, त्यास फॉर्म भरून देऊन जुने कार्ड परत करण्याचे सांगतात. फोन करणारा माणूस खरेच क्रेडिट कार्ड कंपनीचा आहे अथवा नाही, याची शहानिशा न करताच आपण त्याने पाठविलेल्या माणसाकडे आपले जुने क्रेडिट कार्ड देतो. या क्रेडिट कार्डवर जगभरात ऑनलाइन खरेदी करून फसवणूक केली जाते.
  • मोबाइलही कारणीभूत

मोबाइलधारक ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारचे फ्री अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करीत असतात. हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी संबंधित कंपनी तुमच्या मोबाइलमधील डाटा वापरण्याची मुभा तुमच्याकडून घेत असते. तुमच्या मोबाइलमध्ये एटीएम कार्ड, ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि अन्य पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवलेले असल्यास त्याची माहिती संबंधित कंपनीकडे जाते. ही माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत सहज पोहोचते.

  • एटीएम क्लोनिंग - एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटले जातात. एटीएमच्या आत (आपण कार्ड स्वॉप करतो तिथं)एक विषेश प्रकारचं डिव्हाईस ठेवलेलं असते. त्याप्रमाणे आपण पिन टाकतो त्याजवळ माइक्रो कॅमराही लावलेला असू शकतो. हा प्रकार जुन्या एटीएमधारकांसोबत अधिक प्रमाणात घडत असल्याचे समोर आलं आहे. अशावेळी आपण खबरदारी म्हणून पैसे काढताना एटीएम व्यवस्थित हाताळावं. मशीनमध्ये एटीएम स्वाईप करताना काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पिन टाकाताना आपला दुसरा हात वरील बाजूस ठेवावा. आपला पिन क्रमांक दुसऱ्याला दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी. 

काय घ्यावी खबरदारी - 

  • मोबाइल फोन बँकिंग करताना जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत होत नाही, तोवर फोन बँकिंग टाळावे. मोबाइलवर येणारे बँकांचे सर्व कॉल्स टाळावे. 
  • जो मोबाइल तुम्ही वापरता तो घरातील इतरही व्यक्ती वापरत असतील, तर मोबाइल बँकिंगचे अॅप डाउनलोडही करू नका. एकूणच मोबाइल बँकिंग पूर्णपणे टाळा.
  • हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल इत्यादी ठिकाणी बिल क्रेडिट, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पैसे भरताना स्वत: ते 'स्वॅप' करावे. त्याचा पासवर्ड कुणालाही देऊ नये. 
  • एखाद्या एटीएम मशीनबाबत शंका निर्माण झाल्यास तेथे व्यवहार करू नये. 
  • बँकेच्या 'व्हेरिफिकेशन'च्या नावाखाली विचारली जाणारी एटीएम विषयीची माहिती फोनवरून देऊ नये. 
  •  दर तीन महिन्यांनी बदला पिन नंबर   
  • आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका. 
  • पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.  शक्यतो डेट ऑफ बर्थ, मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक पासवर्ड म्हणून ठेवू नका. 
  • डेबीट/क्रेडीट कार्डच्या फोटोकॉपीची प्रत द्यावयाची असेल अशा वेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या. 
  • बँकिंग SMS अलर्टचा ऑप्शन नेहमी सुरु ठेवा. ज्यामुळे तुमच्या कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल. जर तुमच्या खात्यातून कोणीतरी व्यवहार करत असल्याचं जाणवल्यास त्याची माहिती तत्काळ बँकेला द्या.
  • एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटन दाबत चला. जेणेकरुन तुमचा एटीएमचा पासवर्ड सुरक्षित राहिल.

Web Title: A phone call from the bank? ... be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.