पालकांनीही मुलांना रिक्षात कोंबू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:06 AM2018-02-24T05:06:20+5:302018-02-24T05:06:20+5:30

मुलांच्या सुरक्षेची काळजी करणे, हे केवळ शाळेचे कर्तव्य नसून पालकांचेही आहे. पालकांनीही मुलांना भरलेल्या रिक्षात किंवा अन्य वाहनात कोंबू नये

Parents should not get caught in the rickshaw | पालकांनीही मुलांना रिक्षात कोंबू नये

पालकांनीही मुलांना रिक्षात कोंबू नये

Next

मुंबई : मुलांच्या सुरक्षेची काळजी करणे, हे केवळ शाळेचे कर्तव्य नसून पालकांचेही आहे. पालकांनीही मुलांना भरलेल्या रिक्षात किंवा अन्य वाहनात कोंबू नये. शाळेने पालकांच्या या वृत्तीला आळा बसवावा व परिवहन आयुक्तांनी पालकांना त्यांच्या मुलांना भरलेल्या रिक्षात किंंवा वाहनात न बसविण्याचे आवाहन करावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी परिवहन आयुक्तांना केली.
स्कूल बसला परवाना देताना केंद्र सरकारच्या मोटार वाहन अधिनियमाचे पालन करण्यात येत नसल्याने राज्य सरकारला त्याचे पालन करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालक-शिक्षक संघटनेने (पीटीए) उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे होती.
स्कूल बसेस केंद्रीय वाहन अधिनियमानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात की नाही, हे पाहण्यासाठी परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मुंबईतील १० शाळांच्या स्कूल बसेसची पाहणी करावी. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही, हेसुद्धा पाहा, असे न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एका रिक्षात शाळेचे सहा-सात विद्यार्थी कोंबण्यात येत असल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने यावर आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नसल्याचे म्हटले.
‘प्रत्येक गल्ली-बोळात हे चित्र दिसेल. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ शाळेचीच नाही, तर मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनीही जबाबदारी घेणे गरजेचे आहे. ती त्यांच्ीही जबाबदारी आहे. त्यांनीही मुलांना अतिगर्दी असलेल्या वाहनात किंवा रिक्षात कोंबू नये. जे पालक मुलांना भरलेल्या वाहनातून पाठवतात, त्यांना शाळेने असे करण्यापासून परावृत्त करावे,’ असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: Parents should not get caught in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा