padmavati controversy filmmaker ram subramanian says anyone who throws a chappal or shoe at pm narendra modi will be awarded 1lac | पद्मावती वाद : 'जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चप्पल फेकेल त्याला 1 लाख रुपये देईन', चित्रपट निर्मात्याचं वादग्रस्त ट्विट

मुंबई - बहुचर्चित 'पद्मावती' सिनेमावरुन सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच एका चित्रपट निर्मात्यानं वादग्रस्त ट्विट केले आहे. मुंबईतील एका चित्रपट निर्मात्यानं ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत वादग्रस्त ट्विट केले आहे. ''जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चप्पल फेकेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल'', असे वादग्रस्त ट्विट चित्रपट निर्मात्यानं केले आहे.  राम सुब्रह्मण्यम असे या चित्रपट निर्मात्याचं  नाव आहे. कित्येक आंदोलन केली असल्याचा दावादेखील राम सुब्रह्मण्यम यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान,  पद्मावती सिनेमावरुन सुरू असलेल्या वादावर राम सुब्रह्मण्यम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

''जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चप्पल फेकेल, त्यास एक लाख रुपये बक्षीस देण्याची मी घोषणा करतो. भारताच्या नव्या संस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे, या संस्कृतीचं पाया भाजपानं रचला आहे'', असे ट्विट राम सुब्रह्मण्यम यांनी केले आहे. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी पद्मावती विवादासंदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राम सुब्रह्मण्यम यांनी हे ट्विट केले आहे. भाजपाच्या पदाधिका-यानं अभिनेत्री दीपिका पादुकोणचं डोकं छाटणा-याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. भाजपा पदाधिका-यानं केलेली निंदा योग्य असल्याचं डी.के. शिवकुमार म्हणाले होते. 

हरियाणातील भाजपा नेते सूरज पाल अमू यांनी पद्मावती सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचं डोकं छाटणा-याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सूरज पाल अमूच्या या वादग्रस्त विधानावर फिल्म इंटस्ट्रीतील कलाकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला होता.  या प्रकारानंतर भाजपानं सूरज पाल अमूला नोटीसही बजावली होती. यावर सूरज पाल अमूनं असे म्हटले होते, दृश्यांची काटछाट केल्यानंतरही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी लागली तर चालेल पण हा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका सूरज पाल अमू यांनी मांडली.   

दरम्यान, पद्मावती सिनेमा प्रदर्शित झाला तर या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी दीपिका पादुकोणच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. 

राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी गुरुवारी ( 16 नोव्हेंबर ) लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. पद्मावती हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहीमने त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापण्याची जाहीर धमकीदेखील त्यांनी यावेळी दिली.

पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध
पद्मावती या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या सिनेमातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.