आयोजन रोडावले; जखमी वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:54 AM2017-08-16T05:54:21+5:302017-08-16T05:54:25+5:30

मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ११७ गोविंदा जखमी झाले असून ३ गोविंदा अनुक्रमे केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयात दाखल आहेत.

Organized; Wounded! | आयोजन रोडावले; जखमी वाढले !

आयोजन रोडावले; जखमी वाढले !

googlenewsNext

स्नेहा मोरे ।
मुंबई- न्यायालयाच्या कठोर निर्देशांमुळे यंदा दहीहंडी समन्वय समितीने ‘शून्य अपघात ध्येया’चा विचार मांडला होता. मात्र यंदाच्या उत्सवात मुंबईत ६०- ७० टक्के आयोजनाचे प्रमाण घसरूनही जखमींची संख्या वाढल्याचे दिसून आलेय. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ११७ गोविंदा जखमी झाले असून ३ गोविंदा अनुक्रमे केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयात दाखल आहेत.
गेल्या सात वर्षांत १ हजार ३३३ गोविंदा जखमी झाले असून पाच जणांनी जीव गमाविला आहे. यंदा थरांच्या उंचीबाबत न्यायालयाचे निर्देश नसल्याने गोविंदा पथकांनी थरांची ‘उंची’ गाठल्याचे दिसून आले. मुंबई शहर-उपनगरात आयोजन घटूनही जखमींची सरासरी वाढल्याने पुन्हा याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. गेल्या सात वर्षांत २०१३ साली सर्वाधिक गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे.
यंदाही न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीने ‘शून्य अपघाताचे ध्येय’ बाळगले होते. परंतु, तरीही जखमींची संख्या वाढताना दिसून आली. शिवाय, आयोजकांनीही हारनेस्ट लावण्याविषयीचे आदेश पाळले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा हा उत्सव न्यायालयाच्या चौकटीत अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>हा तर चिंतेचा विषय !
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयोजनाचे प्रमाण घसरूनही जखमी गोविंदांच्या संख्येने शंभराचा आकडा पार केला आहे. ६० ते ७० टक्के आयोजन घटूनही जखमी गोविंदांची संख्या वाढतेय, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.
- स्वाती पाटील, दहीहंडी प्रकरणातील याचिकाकर्त्या
>ठाणे-कल्याणमध्ये ११ गोविंदा जखमी
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण शहर आणि ग्रामीण भागात थर उभारताना, ११ गोविंदा जखमी झाले आहेत. यामधील दोन जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. ते दोघे ११ आणि १२ वर्षीय आहेत. दोघांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कळव्यातील वाघोबानगर येथील रितेश कनोजिआ (११) या गोविंदाचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Web Title: Organized; Wounded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.