विद्यार्थी तक्रार निवारणासाठी राज्यातील विद्यापीठांत लोकपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:36 AM2019-03-03T05:36:50+5:302019-03-03T05:37:14+5:30

विद्यापीठ, महाविद्यालयांत उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्रत्येक विद्यापीठात एखाद्या माजी न्यायाधीशांची अथवा वरिष्ठ प्राध्यापकांच्या अंतर्गत लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Ombudsman in the University of the state for redressal of student grievances | विद्यार्थी तक्रार निवारणासाठी राज्यातील विद्यापीठांत लोकपाल

विद्यार्थी तक्रार निवारणासाठी राज्यातील विद्यापीठांत लोकपाल

googlenewsNext

मुंबई : विद्यापीठ, महाविद्यालयांत उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्रत्येक विद्यापीठात एखाद्या माजी न्यायाधीशांची अथवा वरिष्ठ प्राध्यापकांच्या अंतर्गत लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयाच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी लोकपाल नियुक्त केले जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केली. महाराष्ट्र हे लोकपाल नियुक्त करणारे पहिलेच राज्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
लोकपालमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतच्या सर्व प्रकारच्या तक्रारींच्या निवारणाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, विद्यापीठ, तसेच महाविद्यालयांना बंधनकारक असेल. लोकपालचे प्रमुख हे निवृत्त जिल्हान्यायाधीश, निवृत कुलगुरू, निवृत्त कुलसचिव, निवृत्त प्राध्यापक, निवृत्त प्राचार्य दर्जाची व्यक्तीच लोकपाल म्हणून नियुक्तीस पात्र असेल.
लोकपालअंतर्गत, राज्यातील प्रत्येक महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्थेमध्ये महाविद्यालय तक्रार निवारण कक्ष असेल. या कक्षाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य असतील, तर विद्यापीठात तक्रार निवारण कक्ष असेल. यात महाविद्यालय तक्रार निवारण कक्षाची अपीलीय रचना करण्यात येईल. थेट विद्यापीठाच्या विरोधातील तक्रारींसाठी, तसेच महाविद्यालय तक्रार निवारण कक्षाद्वारे निवारण न झालेल्या तक्रारींसाठी हा कक्ष काम करेल. यासोबत विभाग तक्रार निवारण कक्षही असेल. यात विद्यापीठ विभाग किंवा विद्यापीठ परिसंस्थातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येईल. येथे विद्यापीठ विभागाचा किंवा विद्यापीठ परिसंस्थेचा प्रमुख हा अध्यक्षस्थानी असेल, तसेच संस्थात्मक तक्रार निवारण कक्षही येथे असेल.
शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक अभ्यासक्रमांची, विविध सुविधांची, तसेच शिक्षकांची माहिती असलेले माहितीपत्रक (प्रॉस्पेक्टस) प्रसिद्ध करणे किंवा आॅनलाइन प्रकाशित करणे बंधनकारक आहे. प्रवेशापूर्वी किमान ६० दिवस विद्यार्थ्यांना माहितीपत्रक देणे याअंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. माहितीपत्रकातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना संस्थेच्या वेबसाइटवरदेखील उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
>१५ दिवसांत करावे लागेल तक्रारीचे निरसन
लोकपाल आणि तक्रार निवारणाच्या कार्यपद्धतीत तक्रार नोंदविण्यासाठी आॅनलाइन पोर्टल तयार करणे बंधनकारक आहे. तक्रारदाराला त्याची बाजू स्वत: अथवा स्वत: निवडलेल्या, प्राधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे मांडण्याची मुभा असेल. लोकपाल किंवा समितीने दिलेल्या निकालाचे पालन करणे आवश्यक असून, निकाल संस्थेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. चुकीच्या तक्रारीबाबत तक्रारदाराला दंड ठोठावला जाऊ शकतो. विद्यार्थ्याची तक्रार मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत तक्रार निवारण करणे आवश्यक आहे.

Web Title: Ombudsman in the University of the state for redressal of student grievances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.