क्षयरुग्णांची संख्या घटली, ‘क्षयरोगमुक्त मुंबई’साठी पालिकेची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:49 AM2018-03-24T03:49:32+5:302018-03-24T03:49:32+5:30

मुंबईत क्षयरोगग्रस्तांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत बरीच घटली आहे. २०१६ या एका वर्षात मुंबईतील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात मिळून, ४२ हजार ११५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

 The number of tuberculosis decreased, special campaign for 'TB-Free Mumbai' | क्षयरुग्णांची संख्या घटली, ‘क्षयरोगमुक्त मुंबई’साठी पालिकेची विशेष मोहीम

क्षयरुग्णांची संख्या घटली, ‘क्षयरोगमुक्त मुंबई’साठी पालिकेची विशेष मोहीम

Next

मुंबई : मुंबईत क्षयरोगग्रस्तांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत बरीच घटली आहे. २०१६ या एका वर्षात मुंबईतील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात मिळून, ४२ हजार ११५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २०१६-१७ या दोन्ही वर्षांची मिळून क्षयरोग ग्रस्तांची संख्या ४५ हजार ६७५ इतकी झाली. दोन्ही वर्षांची तुलना करता २०१७ मध्ये केवळ ३ हजार ५६० नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे ‘क्षयरोगमुक्त मुंबई’च्या पालिकेच्या मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. क्षयरोगमुक्त मुंबईसाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, खासगी आणि सार्वजनिक इस्पितळांमध्ये क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रचार आणि प्रसार केला जात आहे.
२०१७ मध्ये ४ हजार ८९१ रुग्ण औषधांना दाद न देणारे होते. याखेरीज ६७० एक्स-डी-आर म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणारे होते. या पार्श्वभूमीवर क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून, विविध उपक्रमांचे आयोजनही केले आहे. पालिकेतर्फे २०१७ पासून सर्व क्षयरोग संशयितांना मोफत एक्स-रेची सुविधा उपलब्ध केली जात आहे. एकूण १८ हजार रुग्णांना मोफत एक्स-रे उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षी औषध प्रतिरोधी क्षय निदानासाठी अधिक आठ नवी उपकरणे लावण्यात आली आहेत. सर्व २८ उपकरणांवर आता सरकारी व खासगी रुग्णांचे नमुने तपासले जातात व २०१७ मध्ये आतापर्यंत एकूण ७२ हजार ६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

१६ वर्षांच्या मुलीवरही यशस्वी उपचार
गोरेगाव येथील १६ वर्षीय आरतीवर (नाव बदलले आहे) स्थानिक खासगी रुग्णालयात फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. संदीप तिळवे आणि त्यांच्या टीमने मल्टी ड्रग रेसिस्टंट टीबीवर यशस्वी उपचार केले. योग्य उपचारामुळे तिची प्रकृती आता सुधारली असून ती सामान्य आयुष्य जगू लागली आहे. याबाबत फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. संदीप तिळवे सांगतात - ‘मल्टी ड्रग रेसिस्टंट ट्युुबरक्युलॉसिस हा क्षयरोगाचा गंभीर प्रकार आहे.
यात क्षयरोगाचे जीवाणू पहिल्या टप्प्यावर दिल्या जाणाऱ्या किमान दोन औषधांना प्रतिसाद देत नाहीत. क्षयरोगाचे चुकीच्या पद्धतीने केलेले व्यवस्थापन आणि एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला होणार संसर्ग ही मल्टी ड्रग रेसिस्टंट टीबी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. क्षयरोग झालेल्या व्यक्ती सहा महिन्यांच्या नियमित उपचाराने आणि सहकार्य व देखरेखीमुळे बºया होऊ शकतात. आता उपचारानंतर आरतीची प्रकृती सुधारते आहे.

नऊ वर्षांनंतर क्षयरोगावर मात
२००९ साली क्षयरोगाची लागण झालेल्या झिम्बाब्वेमधील रुग्णाला तब्बल नऊ वर्षानंतर या रोगावर मात करण्यात यश मिळाले आहे. पेशाने शिक्षक असलेले सुमानिया तोशिगंधा (४१) गेल्या सहा महिन्यांपासून छातीच्या दुखण्यामुळे त्रस्त होते. उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या पत्नीने मुंबईतील डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरविले. त्यानंतर मुंबईत एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु झाले. ३० वर्षांचा अनुभव असलेले कार्डिओव्हेस्क्युलर व थोरासिक शल्यचिकित्सक डॉ. सुहास पारीख यांच्या सल्ल्यानंतर सुमानिया तोशिगंधाना मुंबईला हलविण्याचा निर्णय झाला. याविषयी डॉ सुहास पारीख सांगतात, सुमानिया तोशिगंधा यांच्या छातीतून २०० मिलीलीटर पू निघत असे. क्षयरोगाच्या विषाणूंमुळे त्यांचा डावीकडचा फुफुसांचा भाग पूर्णपणे निकामी झाला. १५ दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर तो काढण्यात यशस्वी ठरलो. आता त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा
झाली आहे. गेल्याच आठवड्यात ते मायदेशी परतले.

क्षयरोगाचे निदान कसे केले जाते?
कोणालाही १५ दिवसांपेक्षा जास्त, ओला खोकला, ताप, खोकल्यातून रक्त येणे, छातीत दुखणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास क्षयरोगासाठी आवश्यक त्या तपासण्या कराव्यात. डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी, छातीचा एक्स-रे आणि थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

मे महिन्यापासून घरोघरी शोधमोहीम
सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम (घरोघरी सर्वेक्षण) २०१७ मध्ये २४ वार्डमधून उपक्रम राबविण्यात आले होते. यात एकूण १७ लाख लोकांची पडताळणी झाली, ६ हजार ६३० इतके क्षय संशयित आढळले व ३०४ इतके क्षयरुग्ण आढळले. येत्या मे महिन्यापासून घरोघरी क्षयरोग शोध मोहीम सी.एच.व्ही.मार्फत व ल्युपिन यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

क्षयरोग म्हणजे काय?
क्षयरोग (टीबी) हा एक संभाव्यत: गंभीर संसर्गजन्य आजार आहे. Mycobacterium Tuberculosis Complex  नावाच्या जीवाणूंच्या गटामुळे हा रोग होतो.
बहुतेक रुग्णांमध्ये क्षयरोग फुप्फुसावर परिणाम करतो. त्यामुळे फुप्फुसाचा क्षयरोग आहे असे म्हटले जाते, पण क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो.

- १५० ते २०० औषध विक्रेत्यांद्वारे मोफत एफडीसी औषधे पालिकेच्या नव्या मोहिमेनुसार रुग्णांना पुरविली जातील. औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांच्या उपचारासाठी नवीन पाच बाह्यरुग्ण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शहरात एकूण १४ बाह्यरुग्ण व आंतररुग्ण केंद्र उपलब्ध झाली आहेत. फेब्रुवारी २०१८ पासून सर्व एम.डी.आर. रुग्णांना दर महिन्याला रेशन वाटप करण्यात येत आहे.

शस्त्रक्रिया अधिक प्रभावी
अलीकडील एमडीआर आणि एक्सडीआर टीबीच्या वाढत्या उद्रेकामुळे पूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. आज जरी टीबीवर औषधे उपलब्ध असली, तरी क्षयरोगाचे जीवाणू या औषधांना प्रतिरोधक ठरत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. टीबीची औषधे क्षयरोगामुळे खराब झालेल्या फुप्फुसाच्या भागावर प्रभाव करत नाहीत. खराब झालेला फुप्फुसाचा भाग किंवा पूर्ण फुप्फुस काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येते. अशा प्रकारे जीवाणूंचा भार अधिकाधिक काढून टाकण्यात येतो आणि निरोगी फुप्फुसाला संसर्ग होण्यापासून वाचविता येते. पुढील औषधोपचाराने शिल्लक जीवाणू नष्ट होतात, अशा प्रकारे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला क्षयरोगापासुन मुक्त करता येते. सध्या एमडीआर आणि एक्सडीआर टीबीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा संयुक्तपणे वापर करण्याचा दृष्टीकोन आहे. क्षयरोगाच्या निदानापासून ते क्षयरोगाच्या अडचणी बºया करण्यापर्यंत शस्त्रक्रिया आपली भूमिका बजावू शकते.
- डॉ. अमोल भानुशाली, क्षयरोगतज्ज्ञ.

Web Title:  The number of tuberculosis decreased, special campaign for 'TB-Free Mumbai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.