आता पैसे ठेवायचे तरी कुठे? बँक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर : खातेदारांच्या डाटाचोरीसह दरोड्यांच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:47 AM2017-11-15T02:47:59+5:302017-11-15T02:48:18+5:30

दरोडेखोर, चोर यांच्यापासून घरातील किमती ऐवज सुखरूप राहावा म्हणून खातेदारांनी बँकेच्या लॉकर्सचा आधार घेतला. मात्र बँकेतील लॉकर्स फोडून लुटारूंनी हा सुरक्षित ऐवज चोरल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली.

Now where to put money? Bank security issue on the anvil: Increase in the number of cases of dacoits with account holders' data chorus | आता पैसे ठेवायचे तरी कुठे? बँक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर : खातेदारांच्या डाटाचोरीसह दरोड्यांच्या घटनांत वाढ

आता पैसे ठेवायचे तरी कुठे? बँक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर : खातेदारांच्या डाटाचोरीसह दरोड्यांच्या घटनांत वाढ

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 
मुंबई : दरोडेखोर, चोर यांच्यापासून घरातील किमती ऐवज सुखरूप राहावा म्हणून खातेदारांनी बँकेच्या लॉकर्सचा आधार घेतला. मात्र बँकेतील लॉकर्स फोडून लुटारूंनी हा सुरक्षित ऐवज चोरल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली. या घटनेमुळे आपला किमती ऐवज सुरक्षित ठेवावा कसा, हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे. एकीकडे खातेदारांचे बँक खाते, डेबिट, के्रडिट कार्डची माहिती चोरी करून आॅनलाइन ठगीचे प्रकार वाढत असताना अशा बँक घरफोडीच्या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाढत्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारही शिक्षित झाले. पूर्वी घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांत स्थानिक गुन्हेगारांचा कल अधिक असे. त्यात गर्दुल्ले, नशेखोरांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना ओळखणेही सहज शक्य होते. मात्र बदलत्या काळानुसार गुन्ह्यांच्या पद्धती, गुन्हेगारांचे राहणीमान बदलत आहे. यामध्ये बाहेरच्या गुन्हेगारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरातमधील गुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. हे गुन्हेगार दागिन्यांचे दुकान, बँकेशेजारी भाड्याने घर, दुकान घेतात. महिनाभर रेकी केल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून पैसे घेऊन पसार व्हायचे. अशा पद्धती जोर धरू लागल्या. यामध्ये पश्चिम बंगालमधील साहेबगंज गावातील आरोपींचे प्रमाण अधिक असल्याचे तपासात समोर आले. मुळात येथील संपूर्ण गावच अशा गुन्ह्यांत सहभागी असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांचे म्हणणे आहे. गुन्ह्यांबाबत माहिती मिळते तोपर्यंत ही मंडळी गावी पसार झालेली असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी ही मंडळी हाती लागत नाहीत. संपूर्ण गावच यात गुंतल्याने पोलिसांना मारहाणीच्या घटनांना तोंड द्यावे लागते, असे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईत लुटारूंनी भुयार खोदून बँक आॅफ बडोदाच्या शाखेत घरफोडी केली. बँकेचे २७ लॉकर्स गॅस कटरच्या साहाय्याने लुटून पसार झाले. या घरफोडीमागेही याच टोळीचा हात असल्याचा संशय गुन्हे शाखेने वर्तविला आहे. निर्ढावलेल्या या गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या तसेच कट रचून घरफोड्या, चोरी, दरोडा टाकायला सुरुवात केली. गेल्या ९ महिन्यांत दिवसा आणि रात्री घडलेल्या घरफोड्यांचा आकडा एक हजार ७७६ वर पोहोचला आहे. यापैकी अवघ्या ७६७ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांनी आपला पैसा आणि दागिने बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवला. मात्र नवी मुंबईतील घरफोडीच्या घटनेने सर्वच थक्क झाले आहेत.
मुंबईत अशा प्रकारच्या दरोड्याची घटना घडली नसली तरी एटीएम सेंटर, आॅनलाइन लुटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. सध्या रोखऐवजी आॅनलाइन व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर वाढला असून नवनव्या शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांनी या खातेदारांना टार्गेट केले. दिवसेंदिवस डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा डाटा चोरी होणे, आॅनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले. हे संकट कायम असताना अशा प्रकारे घरफोड्यांचे प्रकार समोर आल्याने चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशी होते कार्डमधून डाटाचोरी...
स्किमिंग प्रकारात एटीएम यंत्रामध्ये कॅमेरा बसवला जातो. तुम्ही डेबिट कार्डाच्या साह्याने एटीएममधून पैसे काढण्याच्या नादात तेथे बसवलेला कॅमेरा तुमचा पिन टिपून घेतो. तर एटीएम आणि स्वाइप मशीनमध्ये स्किमर लावून डेबिट कार्डमधील डाटाची चोरी केली जाते. तुम्हाला एटीएम केंद्रात असा संशय आल्यास याबाबत बँकेला तसेच पोलिसांत तक्रार नोंदवावी.
वर्षभरातील घटना
१७ मार्च २०१७ - धारावी ओएनजीसी जंक्शनवरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधून दिवसाढवळ्या दीड कोटीची रोकड लंपास करण्यात आली होती.
२० जून २०१७ - नागपाडा येथील एटीएममधून २० लाखांची लूट करण्यात आली. सिस्टम अप्लिकेशनद्वारे या मंडळींनी हे पैसे परस्पर काढल्याचे समोर आले होते.
एटीएमच्या सुरक्षारक्षकांवरच हल्ला
मुंबईत एटीएम सेंटर आहेत. मात्र त्या ठिकाणी सुरक्षा पुरविण्याबाबत बँका सक्षम नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. अनेक ठिकाणी एटीएम सेंटरबाहेर सुरक्षारक्षकच नसतात. तर ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत, त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांनाच हल्ल्यासारख्या घटनांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे एटीएम सेंटरमधून स्किमरच्या माध्यमातून डाटा चोरीचे प्रकार वाढताना दिसते आहे.
असे मेल आल्यास टाळा...
बँक खात्याचा तपशील चोरण्याचा प्रयत्न म्हणजे फिशिंग. रिझर्व्ह बँक, आयकर विभाग किंवा बँक यांच्या बनावट वेबसाइटवरून ई-मेल पाठवून, तुमचा तपशील यात मागवला जातो. बँक किंवा कोणतीही वित्तसंस्था कधीही लॉगइन माहिती, पासवर्ड, ओटीपी, युनिक रेफरन्स नंबर यासारखी तुमची वैयक्तिक माहिती मागवत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
पोलीसही
ठरताहेत बळी
कॅशलेस व्यवहार रोखीइतकेच धोकादायक असतात. या चोरट्यांनी पोलिसांनादेखील सोडले नाही. २०१५ मध्ये कुलाबा परिसरात महासंचालक कार्यालयानजीक असलेल्या एटीएममध्ये स्किमर लावून शेकडो पोलिसांच्या कार्डचा डाटा चोरण्यात आला. हा डाटा वापरून पैसे काढण्यात आले, तसेच आॅनलाइन शॉपिंगही करण्यात आली होती.
असे फोन आल्यास
थांबा... विचार करा...
अनेकदा गोपनीय माहिती मिळविण्यासाठी सायबर चोर तुम्हाला फोन करून तुमची माहिती विचारून घेतो. अशा वेळी आपण बँकेचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करून ही माहिती घेतली जाते. असे कॉल आल्यास सतर्क राहणे गरजेचे आहे.
क्लोनिंग : क्लोनिंग आॅनलाइन व आॅफलाइन अशा दोन्ही प्रकारे केले जाते. डेबिट कार्डचे क्लोनिंग केले गेले असेल तर त्याचा वापर एटीएम किंवा पॉइंट आॅफ सेल (पॉस) मशीनमध्ये केला जातो. यामध्ये बसवलेले क्लोनिंग डिव्हायसेस तुमच्या कार्डचा तपशील कॉपी करतात. तुमच्या कार्डाद्वारे तुम्ही केलेल्या व्यवहाराशिवाय एखादा व्यवहार झाल्याचे तुमच्या लक्षात आले तर लगेच बँकेला आणि पोलिसांना सूचित करणे गरजेचे आहे.

Web Title: Now where to put money? Bank security issue on the anvil: Increase in the number of cases of dacoits with account holders' data chorus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.