मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर करण्याची १५ आॅगस्टची तिसरी डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अजूनही विद्यापीठाला तब्बल दीड लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. आॅगस्ट महिन्यातही निकाल जाहीर न झाल्याने, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी रजेवर गेलेल्या कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे.
एप्रिल महिन्यात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. तब्बल १७ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन होणार असल्याचे जाहीर करताना, कुलगुरूंनी निकाल लवकर लागण्यास मदत होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेला निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच आहे. त्यातच कुलगुरू सुट्टीवर गेले. त्यामुळे आता कुलगुरूंना पाठविलेली कारणे दाखवा नोटीस, ही त्यांच्या हकालपट्टीची पूर्वतयारी असल्याची चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.
मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमाचे निकाल उशिरात उशिरा म्हणजे, आतापर्यंत जून महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर झाले आहेत, पण आता आॅगस्ट महिना उजाडला असला, तरीही वाणिज्य, विधि आणि काही कला शाखांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
निकाल लावण्यासाठी या आधी राज्यपालांनी दिलेली ३१ जुलैची आणि त्यानंतर, ५ आॅगस्टची डेडलाइन विद्यापीठाला पाळता आला नाही. अखेर विद्यापीठाने स्वत:च १५ आॅगस्टची डेडलाइन आखली. मात्र, दीड लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी असल्याने, ही डेडलाइनही चुकण्याची शक्यता आहे.

...तर हकालपट्टी होणार
विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्यांच्या पदावरून थेट काढता येत नाही. त्यामुळे विद्यापीठ कायद्याच्या कलम ११(१४) आणि ८९ मधील तरतुदींनुसार ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिशीला समर्पक स्पष्टीकरण न मिळाल्यास, हकालपट्टीची कारवाई होऊ शकते. या संदर्भात कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

हेल्पडेस्कची हेल्प नाहीच : आॅगस्ट महिना उजाडूनही निकाल न लागल्याने, हजारो विद्यार्थ्यांचा परदेशी अथवा अन्य विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. विद्यापीठाने सुरू केलेला हेल्पडेस्क शनिवारी बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठाने शनिवारी पाच निकाल जाहीर केले. पुढच्या तीन दिवसांत १४९ निकाल जाहीर करण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे. विद्यापीठाने शनिवारी ८ हजार ६०४ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले असून १ लाख ७३ हजार ९६४ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अजूनही बाकी आहे.