दादर नव्हे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ , ‘भीम आर्मीनं करून दाखवलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:20 AM2017-12-07T04:20:47+5:302017-12-07T04:22:24+5:30

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दादर स्थानकाच्या नामांतराबाबत रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

Not Dadar, 'Dr. Baba Saheb Ambedkar Terminus', 'Bhima Armeen showed up' | दादर नव्हे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ , ‘भीम आर्मीनं करून दाखवलं’

दादर नव्हे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ , ‘भीम आर्मीनं करून दाखवलं’

googlenewsNext

मुंबई : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दादर स्थानकाच्या नामांतराबाबत रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीने दादर स्थानकाचे थेट ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नामकरण केले. मध्य, पश्चिम दादर स्थानकात ठिकठिकाणी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे स्टिकर चिटकवत त्यांनी रोष व्यक्त केला. याबाबत मध्य रेल्वेची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, दिवा स्थानकात मालगाडी घसरली आहे. ती माहिती घेतल्यानंतर या विषयावर बोलू, असा पवित्रा मध्य रेल्वेकडून घेण्यात आला.
गेल्या काही महिन्यांत राज्यात नावारूपाला आलेल्या ‘भीम आर्मी भारत एकता मिशन’ने बुधवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ अशा नावाचे फलक आणि स्टिकर दादर मध्य, पश्चिम स्थानकावर लावले. भीम आर्मीचे कार्यकर्ते, चैत्यभूमीला आलेले भीमसैनिकही फलकासोबत ‘सेल्फी’ काढत होते. स्थानक परिसरातील मोकळ्या जागीही हे फलक आणि स्टिकर लावले होते.

प्रातिनिधिक नामांतर आंदोलन
दादर पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे ऐतिहासिक निवासस्थान व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, तर पश्चिमेला दादर चौपाटी येथे चैत्यभूमी आहे. आंबेडकरी चळवळीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्थानकाला ‘दादर’ हे नाव संयुक्तिक वाटत नाही. कारण ‘दादर’ या नावाला काही अर्थबोध होत नाही. केंद्र सरकारने ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (व्हीटी)ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव दिले. त्याप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादरला द्यावे, या मागणीकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी प्रातिनिधिक नामांतर आंदोलन केले, अशी माहिती ‘भीम आर्मी भारत एकता मिशन’चे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे व मुंबई प्रमुख अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी दिली.

1996-97
मध्येच प्रस्ताव
महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर १९९६-९७ साली तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी दादर स्थानकाचे
नाव ‘चैत्यभूमी’
करावे, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, नियमानुसार प्रस्ताव न पाठवल्याने हा प्रस्ताव बारगळला.

भीम आर्मीचा इशारा
मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांनी येत्या आठवड्याभरात ‘दादर’चे नामांतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे न केल्यास, त्यांचे सर्व कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने या वेळी दिला.

असे होते नामांतर
1स्थानक नामांतर करण्याचे प्रस्ताव राज्य सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येतो. त्यावर रेल्वे मंत्रालयानेही शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येतो.
2गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतर त्यावर रेल्वे मंत्रालयाकडून औपचारिक शिक्कामोर्तब केले जाते आणि तो प्रस्ताव पुन्हा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येतो.
3आठ स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे. यापैकी प्रभादेवी या नामांतराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

काहीही करून दादर हे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नामकरण करावे, अशी भीम आर्मीची मागणी आहे. त्यासाठी यापुढेही आंदोलनाचा निर्धार त्यांनी केला आहे.

या स्थानकांचा नामांतराचा प्रस्ताव रखडला : एल्फिन्स्टन रोड - प्रभादेवी, मुंबई सेंट्रल - नानाशंकर शेठ, ग्रॅण्ट रोड - गावदेवी, चर्नी रोड - गिरगाव, करी रोड - लालबाग, सँडहर्स्ट रोड - डोंगरी, कॉटन ग्रीन - काळाचौकी,
रे रोड - घोडपदेव

Web Title: Not Dadar, 'Dr. Baba Saheb Ambedkar Terminus', 'Bhima Armeen showed up'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.