मुंबई : मुंबई शहरातील अनिवासी भागात असणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स आणि औषधांची दुकाने २४ तास सुरू राहावीत; या शिवसेनेच्या प्रस्तावाला मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दिला असतानाच यावर भाजपाने केलेली टीका आणि उफाळून आलेला स्वाभिमान; या साऱ्यानेच मुंबईचे नाइट लाइफ आता राजकारणाची वाट चालू लागले आहे.
शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपाने टीका केली असून, रात्रभर येथे मुंबईकरांना परवडणारी पावभाजी आणि वडापावही सुरू ठेवावा, असे म्हणत शिवसेनेला दुहेरी कोंडीत पकडले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी नाइट लाइफचे गोडवे गाणाऱ्यांना शिववड्याचा विसर पडला की काय, असा खडा सवाल उपस्थित करीत सेनेची गोची केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उच्चभ्रू समाजाच्या नाइट लाइफचा विचार करताना सर्वसामान्यांकडे मात्र कानाडोळा करण्यात आला आहे. परिणामी, सर्वसामान्यांसह समाजातील मानाच्या व्यक्तींची नाइट लाइफबद्दल नक्की काय मते आहेत? हे जाणून घेतले असता मुंबईकरही नाइट लाइफबद्दल फारसे काही सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. मुंबई विद्यापीठाच्या महिला विकास कक्ष प्रमुख क्रांती जेजुरकर यांनी सांगितले, नाइट लाइफचा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यानंतर उद्भवणाऱ्या काही परिणामांचा विचार शासकीय पातळीवर आत्ताच केला पाहिजे. नाइट लाइफमुळे रोजगार मिळेल असे म्हटले जात असले तरी तरुण मुलींची सुरक्षितता, वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता अशा काही मुद्द्यांवर संबंधित विभागाने विचारविनिमय केला पाहिजे. जेणेकरून, नाइट लाइफच्या प्रस्तावात काही मर्यादांचा समावेश करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.
प्रेरणाच्या प्रीती पाटकर म्हणाल्या, मुंबईत यापूर्वीच ठरावीक वर्ग हा नाइट लाइफचा आनंद लुटतोय. शिवाय, मुंबई मेट्रोसिटी असल्याने रात्री उशिरांपर्यंत विविध कार्यालये सुरू असतातच. त्यामुळे आता नाइट लाइफसाठी जी कायदेशीर तरतूद केली जात आहे, त्यात त्या ‘कल्चर’शी संबंधित सर्वसमावेशक विचार झाला पाहिजे. यामुळे होणाऱ्या परिणामांचा मर्यादितपणे विचार न करता सर्व दृष्टीने विचार झाला पाहिजे. समाजातील तळागाळातील महिलांसोबत मी गेली अनेक वर्षे काम करते आहे, त्यामुळे तेथील वास्तवही अनुभवले आहे. त्यामुळे शासनाने याकडे राजकारण आणि केवळ त्यातील ‘रेव्हॅन्यू’कडे न पाहता संपूर्ण विचाराअंती त्यावर शिक्कामोर्तब करावे.
राष्ट्रवादीचे नेते कप्तान मलिक म्हणाले, रेस्टॉरंट वगैरे रात्रभर सुरू ठेवणे योग्य नाही. हॉटेल्स आणि मॉल्स अशी चैनीची ठिकाणे सुरू राहणे बरोबर नाही. मात्र सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत; म्हणजे औषधांसारखी दुकाने रात्री सुरू ठेवली तर नक्कीच फायद्याचे ठरेल. निर्मल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांसाठी औषधांची दुकाने रात्रभर सुरू ठेवणे हा भाग वेगळा. परंतु उच्चभ्रू समाजाच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी रेस्टॉरंट सुरू ठेवणे गैर आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सुगंधी फ्रान्सिस यांच्या म्हणण्यानुसार, नाइट लाइफ हा शब्द ऐकण्यासाठी छान वाटतो. परंतु हे सर्वसामान्यांचे आयुष्य नाही, तर उच्चभ्रू समाजाच्या गरजा भागविणारे साधन आहे. दिवसाचे १२ तास काम करून थकणारा सर्वसामान्य मुंबईकर रात्री १२ तास कोणत्याही मॉल्स, रेस्टॉरंट अथवा हॉटेल्समध्ये घालविणार नाही.
शिक्षकीपेशात असणारे संतोष पुकळे यांच्या मते, नाइट लाइफ ही संकल्पना विदेशी आहे. तिथली संस्कृती, राहणीमान, जीवनमान आणि मुंबईची संस्कृती, जीवनमान व राहणीमान यात फरक आहे. त्यातल्या त्यात औषधाची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याबाबत दुमत नाहीच. पण रेस्टॉरंट, मॉल्स आणि हॉटेल्स हे जरा जास्तच होईल. (प्रतिनिधी)

च्देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबापुरी दिवसाचे १२ तास सुरू असली तरी जागतिक शहरांच्या स्तरावर ती रात्रीचेही १२ तास सुरू राहावी. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल, मरिन ड्राइव्ह आणि काळा घोडा अशा अनिवासी क्षेत्रातील मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट आणि औषधाची दुकाने रात्रभर सुरू राहावीत; अशा आशयाचा प्रस्ताव शिवसेनेने महापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांकडे सादर केला.
च्पालिकेसह पोलिसांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शवित तो पुढे राज्य सरकारकडे पाठविला. आता हा प्रस्ताव अधिवेशनात येण्यापूर्वी यावर खलबते सुरू झाली असून, त्याचे राजकारण सुरू झाल्याने त्याला मंजुरी मिळण्यापूर्वी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असेल.

डान्सबार बंद करणारे आर.आर. पाटील यांच्या निधनाला काही दिवस उलटत नाहीत तोच सेना-भाजपाचे तरुण नेते नाइट लाइफची काळजी वाहताहेत, ती कुणासाठी, असा परखड सवाल लोकभारतीचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. मोठ्या बारमालकांसाठी नाइट लाइफचा घाट घालण्यात आल्याचा आरोप करीत ते म्हणाले, रात्री, पहाटे टे्रन, बसने येणाऱ्यांसाठी चहा, नाश्ताच्या टपऱ्या आधी उघड्या ठेवाव्यात.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.