राष्ट्रवादी लागली विधानसभेच्या तयारीला; 1 जूनला प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:17 PM2019-05-27T16:17:08+5:302019-05-27T16:18:21+5:30

बारामती, शिरुर, सातारा, रायगड वगळता राष्ट्रवादीला एकाही जागांवर विजय मिळविता आला नाही. 

NCP gets ready for assembly elections On June 1, the meeting leaders in Mumbai | राष्ट्रवादी लागली विधानसभेच्या तयारीला; 1 जूनला प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक

राष्ट्रवादी लागली विधानसभेच्या तयारीला; 1 जूनला प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची 1 जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष असे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं तर एक अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा निवडून आल्या आहेत. किमान राज्यात 8 ते 10 जागा निवडून येतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला होती मात्र तसं न होता राज्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. बारामती, शिरुर, सातारा, रायगड वगळता राष्ट्रवादीला एकाही जागांवर विजय मिळविता आला नाही. 

मागील लोकसभा निवडणुकीत माढा, कोल्हापूर या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्या जागाही राष्ट्रवादीला राखता आल्या नाहीत. राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. मोहिते पाटील घराण्याने राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने माढाच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली. माढाची जागा भाजपा जिंकणारच असा चंग भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बांधला होता. अखेर या जागेवर भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणीही सतेज पाटील आणि महाडिक या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक निवडून आले. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकदपणाला लावली होती. अजित पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघात तळ ठोकला होता. शेकापच्या बळावर राष्ट्रवादीने पार्थला मावळ लोकसभा मतदारसंघातून उतरवलं होतं. मात्र तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने पार्थ पवार निवडणुकीत हरले त्यामुळे पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणाच्या पर्दापणातच हरली हा फटका बसला. परभणी, बुलडाणा या जागेवर राष्ट्रवादी विजयी होईल असं बोललं जातं होतं मात्र तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नाशिकमधून समीर भुजबळ पराभूत झाले. या सर्व निवडणुकीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. तसेच विधानसभेत काँग्रेससोबत आघाडी करावी की नाही यावरही बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. 
 

Web Title: NCP gets ready for assembly elections On June 1, the meeting leaders in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.