पॉलिकार्बोनेट शिटने झाकणार मुंबईतील नाले! दहिसर, बोरीवलीत पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:53 AM2019-06-25T02:53:04+5:302019-06-25T02:53:14+5:30

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केल्यानंतर, आता नाल्यांवर पॉलिकार्बोनेट शिटचे आच्छादन करण्यात येणार आहे.

Navi Mumbai will cover the pylicarbonate shade! First experiment in Dahisar, Borivli | पॉलिकार्बोनेट शिटने झाकणार मुंबईतील नाले! दहिसर, बोरीवलीत पहिला प्रयोग

पॉलिकार्बोनेट शिटने झाकणार मुंबईतील नाले! दहिसर, बोरीवलीत पहिला प्रयोग

Next

मुंबई  - नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केल्यानंतर, आता नाल्यांवर पॉलिकार्बोनेट शिटचे आच्छादन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाल्यामध्ये कचरा टाकणे व अतिक्रमणाला आळा बसणार आहे. हलक्या वजनाचे असलेले हे आच्छादन ठरावीक अंतरावर उघडणे शक्य होणार आहे. दहिसर आणि बोरीवली येथील नाल्यांवर सध्या हा प्रयोग होणार आहे.

नाल्यांची सफाई केल्यानंतरही स्थानिक रहिवाशी कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे नाले पावसाळ्यात तुंबत असल्याने, पालिका प्रशासनाने स्थानिक रहिवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर, नाल्यात कोणत्या बाजूने कचरा टाकण्यात आला आहे, याचा अंदाज येण्यासाठी ग्रीलही बसविण्यात येत आहे, परंतु ही कारवाई पुरेशी नसून नाल्यांवर उभे राहणारे अतिक्रमण हेदेखील महापालिके पुढील एक आव्हान ठरत आहे. मात्र, नाले पूर्णपणे बंद केल्यास त्याची साफसफाई करणे शक्य होणार नाही.

त्यामुळे नाल्यावर पॉलिकार्बोनेट शिटचे आच्छादन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दहिसर पूर्व येथील व्ही.एच.देसाई नाला, यादवनगर नाला आणि संभाजीनगर नाला, तसेच बोरीवली पूर्व येथील कॉसमॉस नाला व बोरीवली पश्चिम येथील बोर्गे रोडजवळील पालिका उद्यानातील नाला येथे हे आच्छादन टाकण्यात येणार आहे. यासाठी ८५ लाख १३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

९४ हजारांचा दंड वसूल

मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये पालिकेने गस्तिपथके तैनात केली आहेत. या पथकाने आतापर्यंत दोन लाख ९४ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे रुपये ९३ हजार रुपये दंड ‘एम पूर्व’ विभागाकडून वसूल करण्यात आली आहे. ‘एम पूर्व’ विभागात मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या खालोखाल ‘जी दक्षिण’ विभागातून ३२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या विभागात वरळी, लोअर परळ, वरळी कोळीवाडा, प्रेमनगर ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग इत्यादी परिसरांचा समावेश आहे. या खालोखाल ‘एल’ विभागातून ३० हजार, ‘आर दक्षिण’ विभागातून रुपये २४ हजार दंडवसुली करण्यात आली आहे.

Web Title: Navi Mumbai will cover the pylicarbonate shade! First experiment in Dahisar, Borivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई