कमला मिल अग्नितांडवातील सर्व संशयित आरोपींची नार्को चाचणी करा - राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 05:14 PM2018-02-02T17:14:12+5:302018-02-02T17:14:31+5:30

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंबईतील कमला मिल आग प्रकरणातील संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे.

Narco test all the suspected accused in Kamala Mill Firenote - Radhakrishna Vikhe Patil | कमला मिल अग्नितांडवातील सर्व संशयित आरोपींची नार्को चाचणी करा - राधाकृष्ण विखे पाटील

कमला मिल अग्नितांडवातील सर्व संशयित आरोपींची नार्को चाचणी करा - राधाकृष्ण विखे पाटील

Next

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंबईतील कमला मिल आग प्रकरणातील संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई येथील कमला मीलस्थित ‘वन अबव्ह’ आणि‘मोजोज बिस्ट्रो’ या दोन हॉटेल्सना आग लागण्याच्या घटनेबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येते आहे. महानगर पालिकेची नोटीस मिळाल्यानंतर वेळोवेळी मनपा अधिकाऱ्यांना लाच देत असल्याचे ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज बिस्ट्रो’च्या संचालकांनी पोलीस चौकशीत कबूल केल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आहे. निरपराध 14 लोकांचा मृत्यू झालेल्या या घटनेसाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे आम्ही यापूर्वी प्रत्यक्ष भेटून आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरून मुंबई शहरातील बेकायदेशीर व अनधिकृत व्यवसायांना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे संरक्षण प्राप्त होऊन त्यांच्याविरूद्ध कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होते.

या घटनेची पोलीस चौकशी सुरू असली तरी या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणायचा असेल तर‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज बिस्ट्रो’चे सर्व संचालक, कमला मीलचे संचालक,त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांनी विभागीय चौकशीची शिफारस केलेले 10 मनपा अधिकारी आणि अटकेत असलेले अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांची नार्को चाचणी करावी, अशी आमची मागणी आहे. सर्व संशयीतांची नार्को चाचणी झाली तर कमला मीलमधील अग्नितांडवासाठी कारणीभूत असलेले राजकीय नेते व अधिकारी कोण, याची वस्तुस्थिती समोर येईल.

तसेच मुंबई शहरातील बेकायदेशीर व अनधिकृत व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहेत व त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीची संपूर्ण माहिती उघड होऊ शकेल. मुंबई शहरात आजही अनेक ठिकाणी कमला मीलसारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. हा धोका संपविण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता असून,त्याअनुषंगाने आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेत जनतेसमोर सत्य आणण्यासाठी सर्व संशयीतांची नार्को चाचणी करण्यासंदर्भात राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशीही मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पत्रामध्ये केली आहे.

Web Title: Narco test all the suspected accused in Kamala Mill Firenote - Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.