मुंबई : ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या आम्ही करून दाखवतो. ते करताना आम्ही कसे करायचे, हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी उभे राहावे, चोंबडेपणा करू नये, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांचा समाचार घेतला. वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

...तर आमच्या पद्धतीने कारवाई
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारला निवेदन दिले, वस्तुस्थिती समजावून सांगितली, तरीही काही घडले नाही, म्हणून आम्ही हात उचलला, असे म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घातले.

काही दिवसांत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत, माझे पत्र प्रत्येक पोलीस ठाण्यासह महापालिकेला देणार. त्यानंतरही जर पुन्हा फेरीवाले दिसले, तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असा इशाराही राज यांनी दिला.