Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie | 'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी
'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

मुंबई - सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी आपल्या फेसबुक पेजवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. विशेष, म्हणजे नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या नागराज यांनी महामानवास विन्रम अभिवादन करतानाही आपलं वेगळेपण जपलं आहे. नागराज यांनी प्रसिद्ध भीम गायिका कडूबाई थोरात यांच्यासोबतचा आपला फोटो शेअर करुन एक संदेशही लिहिला आहे. 

पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट सारख्या सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटाच्या दिग्दर्शकातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 जयंतीनिमित्त फेसबुकवरुन अभिवादन केलं आहे. 

मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं
आपुन खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रं... 

या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. तसेच, कडूबाईंसोबत सेल्फी घेतानाचा, आपला फोटोही मंजुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊँटवरुन शेअर केला आहे. नागराज हे फेसबुकवर दररोज अॅक्टीव्ह नसतात. मात्र, महापुरुषांच्या जयंतीदिनी आणि काही विशेष असल्यास ते फेसबुकवरुन आपली भूमिका मांडतात. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनीही नागराज यांनी लंडनमध्ये जयंती साजरी केल्याचा सेल्फी फेसबुकवरुन अपलोड केला होता. त्यानंतर, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  अभिवादन करताना नागराज यांनी कडूबाई खरात यांच्या गाण्यातील ओळींसह त्यांचा फोटो शेअर केला आहे. 

औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणाऱ्या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारे गाणे सर्वत्र पसरले. ते आज गावागावांत घुमू लागले आहे. कडूबाई यांनी एकतारीवर गायिलेल्या ‘मह्या भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी...’ या गाण्याला यू-ट्यूबवर लाखो लाईकस् आणि शेअरिंग मिळाले. तसेच मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं, आपुन खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रं... हेही कडूबाईंच गाण सोशल मीडियावर व्हायरल झाल. त्यानंतर, भीमगीतांच्या मोठ-मोठ्या कार्यक्रमात कडूबाईंच्या गाण्याची फर्माईश होऊ लागली आहे. 
 


Web Title: Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.