munna bhai mbbs actor vishal thakkar missing from last 3 years | 'मुन्नाभाई एबीबीएस'मधील 'हा' अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता
'मुन्नाभाई एबीबीएस'मधील 'हा' अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

ठळक मुद्दे'मुन्नाभाई एबीबीएस' या चित्रपटात एका रुग्णाची भुमिका साकारलेला अभिनेता विशाल ठक्कर गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहे.विशाल 31 डिसेंबर 2015 ला आईकडून 500 रुपये घेऊन चित्रपट पाहायला गेला होता. प्रेयसीने विशालवर बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप लावले होते.

मुंबई - अभिनेता संजय दत्तची मुख्य भूमिका असलेला 'मुन्नाभाई एबीबीएस' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील अनेक संवाद आणि पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 'मुन्नाभाई एबीबीएस' या चित्रपटात एका रुग्णाची भुमिका साकारलेला अभिनेता विशाल ठक्कर गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. विशाल ठक्कर 2015 पासून अचानक गायब झाला आहे. तो सध्या कुठे आहे? याबाबत कोणतीही माहिती कुटुंबीयांना अद्याप मिळालेली नाही. सध्या विशालचा शोध घेतला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल 31 डिसेंबर 2015 ला आईकडून 500 रुपये घेऊन चित्रपट पाहायला गेला होता. त्यानंतर त्याने आईला फोन करून तो मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी करायला जात असल्याचं कळवलं. त्यामुळे सकाळी तो घरी परत येईल असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2016 ला त्याने दुपारी एकच्या सुमारास फेसबुकवर हॅपी न्यू ईयरची पोस्ट टाकली होती. त्याआधी साडे अकराच्या सुमारास तो घोडबंदर रोडवर त्याच्या प्रेयसीसोबत पाहण्यात आले होते. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. 

विशाल बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या प्रेयसीकडे याबाबत चौकशी केली असता तिने तो रिक्षा पकडून फिल्मसिटीमध्ये शूटींगसाठी गेल्याचे पोलिसांना सांगितले. बेपत्ता होण्यापूर्वी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता. प्रेयसीने विशालवर बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप लावले होते. मात्र त्यानंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती. विशालने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात प्रेमप्रकरणातून निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती. त्याव्यतिरिक्त त्याने चांदनी बार, टँगो चार्ली या चित्रपटात व तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत काम केले आहे. विशालने अनेक मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका देखील केल्या आहेत.


Web Title: munna bhai mbbs actor vishal thakkar missing from last 3 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.