पाणीपुरवठ्यात सुधारणेसाठी जलवाहिन्या बदलणार, महापालिकेचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:29 AM2018-11-07T04:29:16+5:302018-11-07T04:29:33+5:30

अपुऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. ऐन दिवाळीतही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत.

Municipal Corporation's decision to change the water supply to improve water supply | पाणीपुरवठ्यात सुधारणेसाठी जलवाहिन्या बदलणार, महापालिकेचा निर्णय  

पाणीपुरवठ्यात सुधारणेसाठी जलवाहिन्या बदलणार, महापालिकेचा निर्णय  

Next

मुंबई - अपुऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. ऐन दिवाळीतही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. मात्र मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तक्रारी असलेल्या भागांमधील जलवाहिन्या बदलण्याची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबईत अनेक भागांमध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दिवाळीच्या दिवसात मोठा रोष निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती तसेच पालिका सभागृहात पाणीप्रश्नावर जोरदार चर्चा सुरू आहे. पालिकेच्या गेल्या महासभेवर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. तसेच ऐन सणासुदीत महापौरांच्या बंगल्यावर मोर्चा आणण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. याची दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी पाण्याची तक्रार असलेल्या विभागांमध्ये स्थानिक सहायक आयुक्तांनी पाहणी करून तक्रार निवारण करण्याचे आदेश दिले होते. जीर्ण जलवाहिन्या बदलल्याने पाणीगळतीचे प्रमाणही आटोक्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याचा फटका दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्तीलाही बसला आहे. आॅपेरा हाउस ते एन.एस. रोड जंक्शन, खाडिलकर रोड गिरगाव, ताडदेव सर्कल ते ग्रँड ईस्टर्न रॉयल ते बेलासीस रोड, भोईवाडा लेन तसेच भायखळा, ग्रँट रोड आदी भागात तसेच दादर, माटुंगा, परळ आणि प्रभादेवी या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गळती आणि दूषितीकरण थांबविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी १७ लाख रुपयांची कामे दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
पाणी संकट टाळण्यसाठी हे सर्व केले जात आहे़ मात्र नागरिकांनीही पाणी जपून वापरायला हवे, असे आवाहन करण्यात आले आहे़

८ कोटी ८२ लाखांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी

कुलाबा, ग्रँट रोड, नानाचौक, डोंगरी, भायखळा तसेच पूर्व उपनगरातील चेंबूर, गोवंडी, मंडाळा, कुर्ला या भागातही पाणीटंचाई जाणवत आहे.
आठ कोटी ८२ लाख रुपयांच्या जलवाहिन्यांच्या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली. पाणी वितरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या विभागात सुधारणा करण्याच्या उपाययोजना पालिकेच्या जलअभियंता खात्याने हाती घेतल्या आहेत.

देवनार कॉलनी येथील ९०० आणि १५० मि.मी., ट्रॉम्बे येथील जलाशयाजवळ १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी, मानखुर्द चित्ताकॅम्पजवळ ९०० मि.मी. व्यासाची, गोवंडी येथे ६०० मि.मी. व्यासाची तसेच इतर लहान जलवाहिन्या बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Web Title: Municipal Corporation's decision to change the water supply to improve water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.