गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:08 AM2018-09-13T03:08:24+5:302018-09-13T03:08:35+5:30

रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, रस्तोरस्ती उभे राहिलेले मंडप, नेत्रदीपक रोशणाई, फुलांनी सजलेले बाजार आणि अशाच काहीशा उत्साही वातावरणात श्रीगणेशाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे.

Mumbapuri ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज

गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज

Next

मुंबई : रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, रस्तोरस्ती उभे राहिलेले मंडप, नेत्रदीपक रोशणाई, फुलांनी सजलेले बाजार आणि अशाच काहीशा उत्साही वातावरणात श्रीगणेशाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाच्या उत्साहाने पुढचे दहा दिवस आता मुंबापुरी दुमदुमणार आहे.
गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार असून, दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसह एकवीस दिवसांच्या गणेशोत्सवामुळे अवघी मुंबई गजबजणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सवादरम्यान मुंबईकरांसह भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि उर्वरित यंत्रणाही सज्ज झाल्या असून, उत्सवादरम्यान मुंबईकरांनीही सहकार्य करावे,
असे आवाहन यंत्रणांनी मुंबईकरांना केले आहे.
गणेशोत्सव हा संपूर्ण मुंबईकरांसाठी महापर्वणीच असून देश-विदेशातून नागरिक या उत्सवासाठी मुंबईत येत असतात. गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क व सुसज्ज असून चौपाट्या सुसज्ज व सतर्क ठेवण्यासोबत आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा नागरिकांना योग्यरीत्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना दिले आहेत.
गिरगाव चौपाटी ही दक्षिण मुंबई शहरातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रख्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली चौपाटी असून या चौपाटीवर दक्षिण व मध्य मुंबईतील अनेक छोटी/मोठी सार्वजनिक मंडळे आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करीत असल्याने गिरगाव चौपाटीवर प्रमुख गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सर्व सुविधांसह सज्ज झाली आहे. महापालिकेतर्फे गिरगाव चौपाटीवर जय्यत पूर्वतयारी करण्यात येते. पूर्वतयारी साधारणपणे गणेशचतुर्थीच्या पूर्वी म्हणजेच दीड ते दोन महिने आधीपासून करावी लागते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनांसहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर इ.यंत्रसामग्रीदेखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे. पालिकेने कृत्रिम तलावांत केलेल्या सेवा-सुविधांमुळे कृत्रिम तलावांत मोठ्या संख्येने गणेशभक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करतील, अशी आशाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केली.
>गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दादर फुलमार्केटमध्ये तुफान गर्दी
महागाईचा फटका फुलांनाही बसल्याने यंदा भाविकांनी गणेशोत्सवासाठी चिनी बाजारातील सजावटींच्या फुलांना पसंती दिली आहे. बुधवारी दादरच्या फूल बाजारात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे चिनी फुलांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवात फुलांचा बाजार कायमच तेजीत असतो. ताजी फुले असावीत म्हणून भक्तगण आदल्या दिवशी फुलांची खरेदी करतात. परंतु वाढत्या महागाईचा फटका फुलांच्या खरेदीलाही बसला आहे. फुलांच्या किमतींत पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भाविकांनी आता बनावट सजावटीच्या फुलांना पसंती दिली आहे.दादरच्या फुल बाजार आणि स्थानक परिसरात सजावटीच्या विविध फुलांची दुकाने गेल्या काही दिवसांपासून फुलली आहेत. केवड्याची पाने, तगर आणि जास्वंदी वगळता सर्व फुलांच्या किमती वाढल्या आहेत. याउलट चिनी सजावटीची फुलेही बाजारात उपलब्ध आहेत. पहाडी सोनकाटा आणि जरमारा या फुलांची किरकोळ विक्रीही तेजीत होती. सजावटीच्या फुलांचे अनेक प्रकार या वर्षी बाजारात आले आहेत. त्यात चिनी फुलांचा भरणा अधिक आहे. पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंतची सजावटीची फुले उपलब्ध आहेत. या वर्षी कोलकातामधून हस्तकलेद्वारे तयार केलेली फुलेही आली आहेत.
>विसर्जनाची तयारी पूर्ण
नैसर्गिक विसर्जनस्थळे ही ६९ असून कृत्रिम विसर्जनस्थळे ही ३१ आहेत. त्यासोबतच विसर्जनस्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधांमध्ये स्टील प्लेट ८४०, नियंत्रण कक्ष ५८, जीवरक्षक ६०७, मोटरबोट ८१, प्रथमोपचार केंद्र ७४, रुग्णवाहिका ६०, स्वागत कक्ष ८७, तात्पुरती शौचालये ११८, निर्माल्य कलश २०१, निर्माल्य वाहन/डम्पर १९२, फ्लड लाइट १९९१, सर्च लाइट १३०६, निरीक्षण मनोरे ४८, जर्मन तराफा ५०, मनुष्यबळ (कामगार) ६१८७, मनुष्यबळ (अधिकारी) २४१७ आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
अप्रिय घटना रोखण्यास जरा काळजी घ्या!
गणेश विसर्जनदिनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे. जेणेकरून अप्रिय घटना टाळता येतील, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
२०१७मध्ये नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या सार्वजनिक ११,०९८, घरगुती १,९१,२५४ गणेशमूर्ती अशा एकूण २,०२,३५२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. २०१७मध्ये कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या सार्वजनिक ६५२, घरगुती २८,६३१ गणेशमूर्ती अशा एकूण २९,२८३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Mumbapuri ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.