आॅनलाईन लोकमत

कणकवली : कणकवलीचे सुप्रसिद्ध चित्रकार देवदत्त अरदकर आणि राखी अरदकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं स्टील लाईफ या चित्रप्रदर्शनाचा मुंबईकरांनी अनुभव घेतला. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, एम, जी रोड, काळा घोडा येथे दिनांक २९ मार्चपासून हे प्रदर्शन सुरु झाले आहे. ते ४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं आहे.

कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून निसगार्ची रुपं अनेक तऱ्हेने सादर करीत असतो. कलेला मुर्त स्वरूप देताना कलाकाराचं निसर्गाप्रती असलेलं समर्पण, आकलन आणि कल्पनाशक्ती यांचा कस लागतो. आपल्या कलेच्या माध्यमातून निसगार्शी संवाद साधण्याची कला चित्रकाराच्या कुंचल्यात असते. असंच सादरीकरण देवदत्त अरदकर आणि राखी अरदकर या चित्रकार जोडप्याने केलं आहे.

राखी अरदकर यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलात्मकता त्यांच्या चित्रांमधून जाणवत रहाते. आजुबाजुच्या परिसराशी त्या तादात्म्य पावल्या आहेत, म्हणूनच निसर्गातले सूक्ष्म बारकावे आणि नाजूक हळवे क्षण त्यानी हुबेहूब साकारले आहेत.

सुमारे तीन किलोमीटर परीघ व्यापून राहिलेलं कोळ्याचं जाळं, त्याच्या क्षिद्रांच्या छोट्या-छोट्या आकारामुळे पकडले जाणारे लहान मासे, मोठे मासेही प्रजननाच्या वेळीच पकडले गेल्याने होणार नैसर्गिक संपतीचा ऱ्हास असा एरवी क्लिष्ट वाटणारा विषयही राखी यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून लिलया हाताळला आहे.

व्यावसायिक हेतूने मासेमारी करताना स्वार्थी मनुष्य हव्यासापायी जैवविविधतेकडे, निसर्गसंपत्तीकडे दुर्लक्ष करतो. लोभापायी सृष्टीचा विनाश कारायला निघालेला हा भस्मासूर स्वत:च भस्म होण्याच्या मार्गावर आहे. तंत्रज्ञानाची झापडं लावलेल्या माणसाच्या संवेदना जागृत करताना राखी यांच्या मनातील अंतर्गत संघर्ष आणि स्वत:चा शोध घेताना त्यांच्या हातून घडलेल्या अप्रतिम कलाकृती आपल्याला या प्रदर्शनात पहाता येतील.

दुसरीकडे देवदत्त अरदकर यांनी मांडलेल्या चित्रांमधून एरवी सामान्य वाटणाऱ्या वस्तूकडे वेगळ्या दृष्टीने पहाण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो. घरात नेहमी वापरात असलेली भांडी आणि इतर वस्तू हा त्यांच्या चित्रांचा विषय आहे. नेहमीच्या वापरातल्या आणि सवईच्या या वस्तूंचंही एक आयुष्य आहे आणि त्याचं कालानुरूप दिसणारं रुप देवदत्त यानी हुबेहूब साकारलं आहे. रंगांचा खुबीने केलेला वापर आणि छाया-प्रकाशाचा नेमका आलेख या चित्रांमधून अधोरेखीत होतो.

सिगारेटचा धुर, अर्धा भरलेला प्याला, रिकामी बाटली अशा वस्तू त्यामागची घटना आपल्याला कथन करीत आहेत असं वाटतं एवढी ती चित्रं जिवंत आहेत. रुपकात्मक गोष्टी आणि स्वत:चा अनुभव यांचा मिलाप असणाऱ्या या कलाकृती पाहणाऱ्याला प्रथमदर्शनीच आकृष्ट करतात.

चित्रप्रदर्शनाच्या काळाच्या दरम्यान मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक जिल्हावासीयांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असं प्रेमाचं निमंत्रण राखी व देवदत्त अरदकर यांनी दिलंय.