Mumbai's night shelter on paper! Name of Municipality, works Social Organization | मुंबईतील रात्र निवारे कागदावरच!; नावाला पालिका, कामाला सामाजिक संस्था
मुंबईतील रात्र निवारे कागदावरच!; नावाला पालिका, कामाला सामाजिक संस्था

- चेतन ननावरे

मुंबई : राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत एक लाख लोकांमागे बेघरांसाठी एक रात्र निवारागृहाची उभारणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मुंबईत १८ रात्र निवारागृहे सुरू असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात मनपाने केलेल्या दाव्यातील निवारागृहे म्हणजे सामाजिक संस्थांकडून विविध हेतूने चालविण्यात येणारे आश्रम असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये समोर आले आहे.
रात्रनिवारागृहांमध्ये कोणत्याही व्यक्तीला रात्री-अपरात्री कधीही प्रवेश देण्याचा नियम आहे. रात्रभर राहिल्यानंतर संबंधित बेघर व्यक्ती दिवसा आपल्या कामासाठी बाहेर पडू शकतात. बेघरांसाठी निवारागृहामध्ये झोपण्याची, आंघोळीची, शौचालयाची व्यवस्था असावी, असा नियम आहे. तसेच कोणत्याही स्त्री किंवा पुरुषांना रात्र निवारागृहात कधीही प्रवेश देण्याची गरज आहे. मनपाने जाहीर केलेल्या यादीतील बहुतेक निवारागृहांमध्ये महिला, लहान मुले यांसाठी सामाजिक संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमांचा समावेश आहे. या ठिकाणी विविध कारणांसाठी आश्रम चालविण्यात येत होते. त्यांचे नामफलक बदलून केवळ रात्र निवारागृहाचा फलक लावल्याचे या रियालिटी चेकमध्ये समोर आले आहे.महिलांसाठी चालविण्यात येणाºया आश्रमांमध्ये पुरुषांना, तर मुलांसाठी कार्यरत आश्रमात महिलांना प्रवेश मिळत नसल्याचे पाहणीत आढळले.

कुठेकायदिसले?
महेश्वरी उद्यानाजवळ असलेल्या भाऊदाजी मार्गावर शहरी बेघरांसाठी निवारा केंद्र उभारल्याचा दावा मनपाने केला आहे. त्याप्रमाणे मनपा पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांसाठी प्रागतिक संस्थेअंतर्गत या ठिकाणी निवारा केंद्र चालविण्यात येत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी अनाथ आश्रम चालविला जात आहे. लोकमत प्रतिनिधीने या ठिकाणी छायाचित्रकारासह प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. बेघर असल्याचा दावा करत रात्र निवाºयात रात्र काढण्याची गरज व्यक्त केली. या ठिकाणी १८ ते २५ वर्षे वयोगटातील १० तरुण वास्तव्य करत होते. दिवसा काम आणि रात्री शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. गरज असल्यास धारावी येथील रात्र निवारागृहाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. सोबत महिला असल्याचे सांगताच त्यांना सकाळी घेऊन या, मग कुठे जायचे ते सांगू, असेही उत्तर देण्यात आले.

धारावी, माटुंगा लेबर कॅम्प
या ठिकाणीही वंदे मातरम् फाउंडेशन संस्थेच्या नावाने मनपा संचलित निवारा केंद्राचा फलक लावण्यात आला आहे. रात्री ११ वाजल्यानंतर निवारागृहात प्रवेश मिळणार नसल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. संबंधित विद्यार्थ्याने आपणही या ठिकाणी शिक्षणासाठी राहत असल्याचे सांगितले. महिलांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. शौचालयाची व्यवस्था होती. जेवणासाठी बाहेर व्यवस्था करण्याचा सल्लाही संबंधित विद्यार्थ्याने दिला. तशी कोणतीही व्यवस्था किंवा स्वयंपाकगृह नसल्याची माहिती त्याने दिली. सोबत महिला असल्याचे सांगितल्यानंतर विद्यार्थ्याने केंद्र चालकाला फोन लावून दिला. संबंधित चालकाला संपूर्ण परिस्थिती सांगितल्यानंतरही त्यांची तरतूद प्रगती आणि मदर अशा दोन संस्थांमार्फत चालवण्यात येणाºया आश्रमामध्ये करण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी जागा असतानाही सुरक्षेचे कारण पुढे करीत तरतूद होणार नसल्याचे सांगण्यात आले.

प्रवेशासाठी मारा उड्या
प्रवेशासाठी एफ नॉर्थ साहाय्यक आयुक्त कार्यालयातून प्रवेश देण्यात आला होता. अन्यथा निवारागृहाचा फलक लावलेल्या लोखंडी प्रवेशद्वारावरून उडी मारून प्रवेश करावा लागत होता. निवारागृहात राहणारे विद्यार्थी प्रवेशद्वारावरून उडी मारूनच प्रवेश करीत असल्याचे येथे वास्तव्य करणाºया एका विद्यार्थ्याने सांगितले. तसेच अवघे १० विद्यार्थी दाटीवाटीने राहतील, असे हे निवारागृह होते.

शेल्टर डॉन बॉस्को, वडाळा
वडाळ्यातील शेल्टर डॉन बॉस्को या पालिकेच्या यादीतील निवारागृहाने तर हे शेल्टर मनपाचे नसल्याचे सांगत मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. रात्री ११.३० वाजता ‘लोकमत’च्या दोन प्रतिनिधींनी या ठिकाणी बेघर असल्याचे सांगत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. हा रस्त्यावरील आणि अनाथ मुलांसाठी चालविण्यात येणारा आश्रम असल्याचे सांगत सुरक्षा रक्षकाने प्रवेश नाकारला. महत्त्वाची बाब म्हणजे रात्र निवारा असल्याचा कोणताही फलक संस्थेने या ठिकाणी लावलेला नाही. त्यामुळे पालिकेने यादीत दावा केलेले रात्र निवारागृह गेले तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.


Web Title: Mumbai's night shelter on paper! Name of Municipality, works Social Organization
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.