मेट्रोच्या कामांमुळे यंदा मुंबई तुंबणार नाही! एमएमआरडीएचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:34 AM2019-05-07T03:34:06+5:302019-05-07T03:58:07+5:30

मुंबईत सध्या पाच मेट्रो प्रकल्पांची (मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७) कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गिकांच्या कामांदरम्यान पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होणार नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

 Mumbai will not be tumbled due to Metro works! MMRDA claims | मेट्रोच्या कामांमुळे यंदा मुंबई तुंबणार नाही! एमएमआरडीएचा दावा

मेट्रोच्या कामांमुळे यंदा मुंबई तुंबणार नाही! एमएमआरडीएचा दावा

Next

मुंबई : मुंबईत सध्या पाच मेट्रो प्रकल्पांची (मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७) कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गिकांच्या कामांदरम्यान पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होणार नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.
मुंबईमध्ये सध्या डी.एन. नगर ते दहिसर पश्चिम मेट्रो-२ अ, डी.एन. नगर ते मंडाळे मेट्रो-२ ब, वडाळा-घाटकोपर मुलुंड-ठाणे कासारवडवली मेट्रो-४, समर्थ नगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग मेट्रो-६ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ या मेट्रो प्रकल्पांची कामे एमएमआरडीएमार्फत सुरू आहेत. या मेट्रो मार्गांमुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने विशेष उपाययोजना राबविल्या आहेत.
महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी पावसाळ्यासंबंधित निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेऊन ७५ अभियंत्यांचा एक गट नेमला आहे. या गटाच्या मदतीला १५० कामगार आणि पाण्याचा निचरा करणारे ३० पंप असणार आहेत. सध्या सुरू असणाऱ्या पाचही मेट्रो प्रकल्पांसाठी उपाययोजना राबविण्याचे काम ही टीम करणार असल्याचे प्राधिकरणामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मेट्रो मार्गावरील नेमून दिलेल्या प्रत्येक ठिकाणी एक वाहन तैनात असेल. या वाहनांमध्ये आवश्यक ती यंत्रसामग्री आणि कामगार हजर असतील. ड्रिलिंग आणि पाईलिंगचे काम सुरू असताना निर्माण होणारा राडारोडा (डेब्रिज) आणि चिखल रस्त्यांवर पसरू नये, यासाठी आवश्यक यंत्रणाही तेथे सज्ज असेल. ड्रिलिंग आणि पाईलिंगचे काम पूर्ण झाले असल्यास तेथील बॅरीकेट्स हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करणे; तसेच संबंधित महापालिका वॉर्ड कार्यालयाशी नियमित संपर्कात राहणे आणि मेट्रो मार्गाचे नियमित निरीक्षण करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. मुंबईकरांचे नियमित जीवन विस्कळीत होऊ नये, हेच आमचे ध्येय आहे. - आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

आपत्कालीन केंद्र स्थापन करणार

पावसाळ्यादरम्यान २३.५ किमी लांबीचा पूर्व द्रु्रुतगती महामार्ग आणि २५.३ किमी लांबीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गांची देखभाल करण्यासाठीही महानगर आयुक्तांनी १० अभियंते, ३०० कामगार आणि १२ पाण्याचा निचरा करणारे पंप नियोजित केले आहेत. ही टीम दोन्ही द्रुतगती मार्गांवरील नाल्यांची सफाई आणि खड्ड्यांची भरणी करणार आहे.

रस्त्यांवरील मॅन होल्सची झाकणे जागेवरच आहेत याची शहानिशा करणे तसेच पाण्याचा निचरा करणारी यंत्रे नादुरुस्त होणार नाहीत याची खबरदारी ही टीम घेणार आहे. या टीमच्या मदतीला जेसीबी आणि डम्पर्सदेखील उपलब्ध केले जाणार आहेत.
शिवाय सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामादरम्यान अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title:  Mumbai will not be tumbled due to Metro works! MMRDA claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.