Join us  

मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:10 PM

पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे

मुंबई - पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या 56 व्या दीक्षान्त समारंभात बोलताना मोदींनी मुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मुंबई आयआयटीच्या विकासासाठी 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या दीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आयआयटीच्या वतीने सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी. वाधवानी यांना डी लिट प्रदान करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौर्‍यावर दाखल झाले. विमानतळावर त्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. यानंतर ते आयआयटी बाँबेच्या 56व्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले. आयआयटीच्या कॉनव्होकेशन हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. पीएच.डी. धारक आणि विविध शाखांमधील टॉपर्सला पदवी प्रदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू झाले. त्यांनी आजच्याच दिवशी खुदीराम बोस हे हुतात्मा झाले असल्याचे सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली. आयआयटी मुंबईला सहा दशकांची स्वर्णीम परंपरा असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 100 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही यात्रा आता दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचे ते म्हणाले. या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जगभरात नावलौकीक मिळवला असल्याचे कौतुकोदगार मोदींनी काढले.   आयआयटीला आता एक हजार कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून यातून अजून जास्त पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी हा जगभरातील एक अतिशय उज्ज्वल ब्रँड बनला असल्याचे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानामुळे देशात नवीन क्रांती झाली आहे. यात स्टार्टपच्या युगात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोलाचे स्थान असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आयआयटी मुंबईचा कँपस अतिशय उत्तम असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. गत चार वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय बरेच काही येथे शिकायला मिळाले. याचा त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर अनुकुल परिणाम झाला असल्याचेही ते म्हणाले. आयआयटी मुंबई हे खर्‍या भारताचे प्रतिनिधीत्व करत असल्याची वाखाणणी पंतप्रधानांनी केली. भारतीय समाजाच्या वैविध्याचे येथे दर्शन घडत असल्याचेही ते म्हणाले. 5जी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स, मशीन लर्नींग आदी तंत्रज्ञान येणार्‍या कालखंडात जगाला बदलून टाकणार असून यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा राहील. आयआयटी आता इंडिया इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बनले असल्याचे मोदी म्हणाले. या माध्यमातून होणारा बदल हा भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जगभरातील विविध स्टार्टप्समध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा असल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमिवर, आयआयटीमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. या कार्यक्रमात रमेश वाधवानी यांना मानद डी.एससी. पदवी प्रदान करण्यात आली.

 

टॅग्स :नरेंद्र मोदीआयआयटी मुंबईमुंबईदेवेंद्र फडणवीस