मुंबई विद्यापीठाचा दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा; उत्तर पत्रिकेवर असणार 'दिव्यांग' असा स्टॅम्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:56 PM2018-09-25T17:56:01+5:302018-09-25T17:56:25+5:30

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर 'दिव्यांग' (PWD) उल्लेख असणारा इंग्रजी व मराठी भाषेतील उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे, जेणेकरून याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार आहे.

Mumbai University's students; answer sheet is 'Divyang' stamp | मुंबई विद्यापीठाचा दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा; उत्तर पत्रिकेवर असणार 'दिव्यांग' असा स्टॅम्प 

मुंबई विद्यापीठाचा दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा; उत्तर पत्रिकेवर असणार 'दिव्यांग' असा स्टॅम्प 

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने मागील वर्षापासून संगणकाद्वारे उत्तरपत्रिकेचे ऑनलाईन मूल्यांकन सुरु केले आहे. सदर प्रणाली राबविताना विद्यापीठास दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्यात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्र २०१८ च्या परीक्षेपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर 'दिव्यांग' (PWD) उल्लेख असणारा इंग्रजी व मराठी भाषेतील उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे, जेणेकरून याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार आहे.

मुंबई विद्यापीठ मागील वर्षापासून उत्तरपत्रिकांचे संगणकाधारित ऑनलाईन मूल्यांकन करीत आहे. संगणकाधारित मूल्यांकन करीत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या  त्या अडचणी दूर करण्यासाठी हिवाळी सत्र २०१८ च्या परीक्षेपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मूळ व पुरवणी उत्तरपत्रिकेच्या ०३, १०, व १५ व्या पानावर उजव्या बाजूच्या वरील भागात (Top Right Side) 'दिव्यांग' (PWD) असा उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे. असा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला होता. या निर्णयाच्या आधारे हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. हे परिपत्रक मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा केंद्रांना पाठविण्यात आलेले आहे. सदरचा उल्लेख असणारे रबरी स्टॅम्प प्रत्येक महाविद्यालयांनी त्वरित बनवून घेणाच्या सूचना या परिपत्रकात केल्या आहेत. तसेच सदरचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये सोयी-सवलती उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने ४ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला होता, त्या आधारावर दि.२२ मार्च, २०१७ रोजी मुंबई विद्यापीठाने या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले  होते. यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना  दर तासाला २० मिनिटे म्हणजेच ३ तासाच्या परीक्षेसाठी ६० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येतो.  दिव्यांग विद्यार्थ्यांना ५ टक्के गुणाची सवलत देण्यात येते तसेच परीक्षेसाठी लेखनिकाची सवलत देण्यात येते. गरोदर माता-भगिनी परीक्षा देत असतील तर त्यांना जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येते तसेच त्यांची बैठकव्यवस्था तळमजल्यावर करण्यात येते. तशा सूचना मुंबई विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयांना दिलेल्या आहेत.

याच अनुषंगाने उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांना सदर विद्यार्थी 'दिव्यांग' आहेत हे निर्देशित होण्यासाठी अशा स्वरूपाचा शिक्का उत्तरपत्रिकेवर मारण्यात यावा जेणेकरून शिक्षक दिव्यांगाची उत्तरपत्रिका तपासताना शासनाने दिलेल्या निर्देशाचा अवलंब करेल व त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार गुण देवू शकेल याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होईल.   

मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करण्यासाठी संगणकाधारित प्रणालीचा अवलंब केल्यामुळे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनामध्ये काही अडचणी येत होत्या. सदरचा 'दिव्यांग' हा शिक्का उत्तरपत्रिकेवर मारल्याने, शिक्षक शासन निर्णयानुसार दिव्यांगांच्या उत्तरपत्रिका तपासतील. याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना निश्चित होईल. 
-  डॉ. अर्जुन घाटुळे    
 संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ 

Web Title: Mumbai University's students; answer sheet is 'Divyang' stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.