दुस-या दिवशीही सर्व्हरचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:23 AM2017-07-26T06:23:33+5:302017-07-26T06:23:35+5:30

मुंबई विद्यापीठाने शेवटच्या दिवसांत आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा धडाका सुरू केला आहे.

mumbai Univarcity website problem | दुस-या दिवशीही सर्व्हरचा प्रश्न कायम

दुस-या दिवशीही सर्व्हरचा प्रश्न कायम

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शेवटच्या दिवसांत आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा धडाका सुरू केला आहे. महाविद्यालयांना सुटी जाहीर केल्यापासून अवघ्या दोन दिवसांत प्राध्यापकांनी दोन लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केल्याचा चमत्कार विद्यापीठात घडला आहे. पण, दुसºया दिवशीही सर्व्हरचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्याचे विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी सांगितले. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचा वेग अचानक वाढलाच कसा, नक्की किती आणि कशा प्रकारे उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, यावर संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जून महिना संपल्यावरही मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर न झाल्याने या प्रकरणात राज्यपालांनी ४ जुलैला हस्तक्षेप करून ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर मुबंई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी कंट्रोल रूम सज्ज करून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले. पण, तरीही आॅनलाइन तपासणीत सर्व्हरचा व्यत्यय येत असल्याने प्राध्यापकांच्या उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला होता. निकाल लावण्यासाठी दिलेल्या डेडलाइनला अवघे आठ दिवस उरले असताना मोठ्या प्रमाणात प्रक्रियेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. पण, दोन दिवसांत इतक्या झपाट्याने उत्तरपत्रिका तपासणी कशी होत आहे, असा प्रश्न विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटनांनी उपस्थित केला आहे.
मंगळवारी सकाळी प्राध्यापक कॅप सेंटरमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी पोहोचल्यावर पुन्हा सर्व्हरचा प्रश्न उद्भवला होता. प्राध्यपकांनी लॉगइन केले. पण, एक एक पान अपलोड व्हायला वेळ जात होता. सर्व्हर व्यवस्थितपणे कार्यरत नसल्याने याचा मोठा फटका हा मॉडरेशनला बसत आहे. मॉडरेशन करताना प्राध्यापकांना अडचणी येत आहेत. अनेक प्राध्यापकांच्या मते उत्तरपत्रिकांच्या आकड्यांमध्ये तफावत येत आहे. काही प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासल्याचे अभिनंदनाचे मेल येत आहेत. तर, काहींनी मॉडरेट केलेल्या उत्तरपत्रिकांपेक्षा कमी उत्तरपत्रिका मॉडरेट झाल्याचे सिस्टिमवर दिसत आहे. हेल्पलाइनला कॉल करून प्राध्यापकांनी या समस्या सांगितल्यावर योग्य तो आकडा अपलोड होईल असे सांगण्यात येत असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले. मंगळवारीही उत्तरपत्रिका तपासणी करताना प्राध्यापकांना त्रास झाला. विज्ञान विभागाच्या उत्तरपत्रिकांचा गोंधळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्याची गंभीर दखल घेत मंगळवारी डॉ. माधवी पेजावर आणि डॉ. अनिल कर्णिक यांनी विज्ञान शाखेच्या अभ्यास मंडळाच्या सर्व प्रमुखांची बैठक घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर मेरिट ट्रक कंपनीच्या मदतीने हे प्रश्न मार्गी लावले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन चुकू नये म्हणून पुणे विद्यापीठ धावून आले आहे. पुणे विद्यापीठाचे विशेष अधिकारी ललित पवार हे त्यांच्या सहकाºयांसह मुंबई विद्यापीठात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मंगळवार ठरला विक्रमी उत्तरपत्रिका तपासणी दिन
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला उशीर झाल्याचे आता स्पष्ट
झाले आहे. या प्रकरणासंदर्भात सोमवारी राज्यपालांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढला आहे. मंगळवारी एका दिवसात ५ हजार ३५८ प्राध्यापकांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत
१ लाख ५ हजार ४९१ उत्तरपत्रिका तपासल्या असल्याची माहिती विद्यापीठाकडून मिळाली.

प्राध्यापकांना शाबासकीची थाप
मंगळवारी ६ तास उत्तरपत्रिका तपासणाºया सर्व प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली. गेल्या वर्षी उत्तरपत्रिका तपासणी करूनही त्या वेळची बिले न मिळाल्याने या वर्षी प्राध्यापकांचा उत्साह कमी होता. त्यामुळे यंदा कमी प्राध्यापक या प्रक्रियेत सहभागी झाले. बाकी असलेली बिले निकाली काढल्याची माहिती विशेष अधिकारी डॉ. विनायक दळवी यांनी दिली. यंदापासून प्राध्यापकांना नव्या दराने मानधन दिल्याचे परिपत्रकही जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: mumbai Univarcity website problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.