मुंबई पुन्हा वेठीस! साडेतीन तास रेल रोको, रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:24 AM2018-03-21T05:24:46+5:302018-03-21T05:25:00+5:30

अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या सर्व उमेदवारांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीवरून मंगळवारी मुंबईत असंतोषाचा उद्रेक झाला. दादर माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी देशभरातील हजारावर तरुणांनी तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन करत मुंबईची नाकेबंदी केली.

Mumbai resident again! Three-and-a-half-hour rail roko, rail traffic jam | मुंबई पुन्हा वेठीस! साडेतीन तास रेल रोको, रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने प्रवासी संतप्त

मुंबई पुन्हा वेठीस! साडेतीन तास रेल रोको, रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने प्रवासी संतप्त

Next

मुंबई : अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या सर्व उमेदवारांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीवरून मंगळवारी मुंबईत असंतोषाचा उद्रेक झाला. दादर माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी देशभरातील हजारावर तरुणांनी तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन करत मुंबईची नाकेबंदी केली. रेल्वे बोर्ड मागण्यांचा सकारात्मक विचार करेल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.
सकाळी ‘पिक अवर्स’मध्ये मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या वेळेसच विद्यार्थ्यांकडून आंदोलन छेडण्यात आले. मनसेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून ओला-उबरविरोधात संप पुकारण्यात आल्याने सोमवारी रस्ते आणि मंगळवारी मुंबईकरांची लाइफलाइन बंद झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. रेल रोकोनंतर वेळापत्रक कोलमडल्याने सायंकाळपर्यंत याचा परिणाम दिसून आला. रेल
रोकोमुळे दिवसभरात ६८ लोकल फेऱ्या
रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य
रेल्वेने दिली.
सुमारे ८०० ते १ हजार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको केला. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी आंदोलनकांना हटविण्यासाठी बोलणी सुरू केली. मात्र या वेळी आंदोलनकर्त्यांच्या जमावाने अचानक केलेल्या दगडफेकीत ५ रेल्वे पोलीस
आणि ६ रेल्वे सुरक्षा बलाचे
अधिकारी जखमी झाले. अखेर पोलिसांनी जमाव हटविण्यासाठी लाठीचार्ज
केला. साडेदहा वाजता जमाव हटवण्यास यश आले.

२० टक्के जागा राखीव
सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शक
व योग्य पद्धतीने व्यापक स्तरावर भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी कायदा कलम २२(१)नुसार २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या
आहेत. ज्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीनुसार वयातही सवलत देण्यात आली आहे. यंदाची भरती देशात कोणत्याही संघटनेतर्फे करण्यात येणारी सर्वाधिक भरती आहे. ३१ मार्चपर्यंत अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशातील युवा वर्गाला करण्यात येत आहे, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल म्हणाले.

८०० ते १ हजार जणांवर गुन्हे : आंदोलकांवर दादर रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गोकूळ लोहार (२६) जळगाव आणि अतिश कुमार रघुनंदन (२२) नेरूळ या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कलम ३०७, ३५३, ३२३, १४१ ते १४७ भादंवि, १७४ भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

आंदोलनात ‘मनसे’ने घेतली उडी
रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या लढ्यात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही
उडी घेतली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींसह मनसेचे शिष्टमंडळही दिल्लीसाठी मंगळवारी रवाना झाले.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मनसेचे नेते आणि पदाधिकारीही रुळावर उतरले होते. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर, विद्यार्थी मनसेच्या पदाधिकाºयांसह थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.
त्या वेळी मनसेचे नेते तुमच्याबाबत चर्चेसाठी दिल्लीला पाठवित असल्याचे राज यांनी स्पष्ट केले होते. दिल्लीत सर्वांशी नीट आणि शांतपणे बोला, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. दरम्यान, एका प्रशिक्षणार्थीने सांगितले की, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसेतर्फे शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी आश्वासित केले, म्हणजे प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास वाटत आहे.

असे चिघळले आंदोलन
रेल्वे प्रशासनाकडून माटुंग्यासह विविध वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिशियन, गँगमन, ट्रॅकमन, मॅकॅनिकल, खलाशी अशा पदांसाठी प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाते. अशा १८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०१६ पूर्वी त्यांना रेल्वेच्या नोकºयांमध्ये समाविष्ट केले होते. मात्र २०१६ नंतर त्यांना रेल्वेच्या नोकºयांमध्ये समाविष्ट करणे बंद करण्यात आले. अशा विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरतीमध्ये २० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल रोको करण्यात आला.
- सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास १ हजार ते १२०० विद्यार्थी रेल्वे रुळावर कोणतीही पूर्वसूचना न देता जमा झाले.
- माटुंगा रेल्वे कॉलनी येथील सुरक्षा गेटमधून काही आणि माटुंगा स्थानकाहून काही विद्यार्थी एकत्र आले.
- याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
- मेल-एक्स्प्रेस रुळावर रेल रोको करत आंदोलनाला सुरुवात.
- ६.५७ मिनिटांनी ठाणे डाऊन लोकल अडवून आंदोलनाला सुरुवात.
- आरपीएफ-जीआरपी आंदोलनकर्त्यांसह बोलणी सुरू करत हळूहळू आंदोलनकर्त्यांना रुळाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
- आंदोलन अयशस्वी होत असल्याचे पाहत जमावातील काहींकडून दगडफे क सुरू.
- अप देवगिरी आणि डाऊन सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक.
- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी थांबलेल्या लोकलमधील ठाणे दिशेकडील पाच बोगी रिकाम्या करण्यात आल्या.
- आंदोलक हटविण्यासाठी सौम्य लाठीमार.
- दादर-माटुंगा दरम्यान किमी नं. ९-१६ व सेंट्रल केबिनजवळ १ हजार ते १२०० विद्यार्थी एकत्र येत सर्व रेल्वे मार्गावर रेल रोको केला.
- सकाळी १०.३५ वाजता रेल्वे धिम्यागतीने सुरू.

११ पोलीस जखमी
आंदोलक विद्यार्थ्यांना रुळावरून हटविण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल घटनास्थळी उपस्थित होते. संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली. यात दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक सातव, पोलीस उपनिरीक्षक माने, महिला पोलीस शिपाई सानप, महिला पोलीस शिपाई पुरळकर आणि रेल्वे सुरक्षा बलाचे सचिन मोर, संतेंद्र कुमार, मनोज यादव, जसवीर राणा, धर्मेंद्र कुमार, एल. प्रकाश असे ११ पोलीस जखमी झाले.

रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्या
पूर्वी रेल्वे प्रशिक्षणार्थींना थेट रेल्वेत सामावून घेतले जात होते. मात्र २० टक्के इतका कोटा निश्चित करण्यात आला. शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतील संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.
- २० टक्के कोटा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
- रेल्वे कायद्यानुसार प्रशिक्षणार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करावे.
- भविष्यातही हाच नियम लागू ठेवावा. याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नयेत.

गुप्तचर विभागाची माहिती
रेल्वे आणि राज्य गुप्तचर विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशिक्षणार्थी २०० ते ३०० विद्यार्थी दादर रेल्वे विभागात आंदोलन करतील, असा सतर्कतेचा इशारा सोमवारी देण्यात आला होता. भारतीय रेल्वेमध्ये सुमारे २७ हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थींची संख्या सुमारे १८०० तर मुंबईत काम करणाºयांची संख्या ५०० च्या सुमारास आहे.

शिवसेना खासदार रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला
रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या रेल
रोकोच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. त्यात खा. आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य सेना खासदारांचा समावेश होता. रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत सेना खासदारांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे
केली आहे.

दोषींवर कारवाई होणारच
रेल रोको करणे हे चुकीचे होते. याचा फटका लाखो मुंबईकरांना बसला. आंदोलकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रेल्वे बोर्डातील संबंधित अधिकाºयांनी भेट घेत चर्चा करावी’, असे मध्य रेल्वेने लिहून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र गुन्हा नोंद झाल्यामुळे कारवाई होणारच.
- संजय कुमार जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

कायदा हातात घेणे चिंतेचे
दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको करण्यात आला. मुळात शिक्षित युवावर्गाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कृती होणे गैर आहे. युवावर्गाकडून कायदा हातात घेत मागण्या मांडणे ही चिंतेची बाब आहे.
- निकेत कौशिक, आयुक्त, रेल्वे पोलीस

Web Title: Mumbai resident again! Three-and-a-half-hour rail roko, rail traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.