Mumbai Mega block to affect train services on Sunday | बेस्टच्या संपात रविवारचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल कायम
बेस्टच्या संपात रविवारचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल कायम

ठळक मुद्देरेल्वेने मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे.मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर-कर्जत दरम्यान पायाभूत सुविधेसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई - रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तुम्ही जर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर एकदा तरी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा. कारण पश्चिम मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. बेस्ट उपक्रमातील 30 हजार कामगारांना विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. रविवारचा ब्लॉक आणि बेस्ट रस्त्यावर नसल्याने मुंबईकरांचे आणखी हाल होणार आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर-कर्जत दरम्यान पायाभूत सुविधेसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.45 ते दुपारी 2.45 पर्यंत कर्जत दिशेकडे जाणाऱ्या लोकल आणि सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 पर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा परिणाम हेणार आहे. 

बेस्ट संपामुळे पर्यायी वाहतूक म्हणून लोकलच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसांपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. रविवारी बेस्टचा संप आणि त्यातच दोन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांना प्रवास करणे कठीण होणार आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांनी नियोजित वेळपत्रक तयार करूनच बाहेर पडावे. संपादरम्यान लोकलच्या जादा गाड्या सोडल्या असताना याचा वापर प्रवाशांकडून करण्यात आला नाही. परिणामी दोन्ही मार्गावर विशेष जादा लोकल सोडण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.   


Web Title: Mumbai Mega block to affect train services on Sunday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.