Mumbai Local : रेल्वे प्रशासन झुकलं, फक्त अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार विशेष परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 09:23 AM2018-03-20T09:23:45+5:302018-03-20T15:36:03+5:30

ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनानं रेल्वे प्रशासनाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं.

Mumbai Local: Central Railway traffic affected as 'rail-roko' agitation by railway job aspirants, special examination to be taken only for Apprentice students | Mumbai Local : रेल्वे प्रशासन झुकलं, फक्त अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार विशेष परीक्षा

Mumbai Local : रेल्वे प्रशासन झुकलं, फक्त अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार विशेष परीक्षा

Next

मुंबई - ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनानं रेल्वे प्रशासनाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं. रेल्वेच्या प्रशासनानं प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याचं जाहीर केले. या परीक्षेसाठी 31 मार्च 2018 पर्यंत फॉर्म भरता येतील. प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत सामावून घेतलं जात नव्हतं म्हणून नाराज विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन अखेर यशस्वी झालं.

आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र झालंय. पण त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना, लाखो नोकरदारांना, महिला प्रवाशांना बसतोय. त्यामुळे आम्हाला वेठीस का धरता, असा सवाल अनेक चाकरमानी करत आहेत. तरुणांच्या मागण्यांबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे, त्यांना न्याय मिळावा, नोकऱ्या मिळाव्यात हीच आमचीही भावना आहे, पण कुणाच्या तरी चुकीची शिक्षा ते आम्हाला देत आहेत, अशा भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या.

काय आहे प्रकरण?

रेल्वे भरतीतील गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (20 मार्च) दादर-माटुंग्यादरम्यान रेल रोको केला . या रेल रोकोमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ ही रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे. आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

काय आहेत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मागण्या ?

  • रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
  • रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
  • यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये

 

Web Title: Mumbai Local: Central Railway traffic affected as 'rail-roko' agitation by railway job aspirants, special examination to be taken only for Apprentice students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.