ठळक मुद्देअनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होतीफेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करता येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालायने रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरावर फेरीवाले बसू शकत नाही हे आपल्या आदेशात सांगितलं आहे

मुंबई - मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायने संजय निरुपम यांना चांगलाच दणका दिला आहे. संजय निरूपम यांच्यासह राज्यभरातील विविध फेरीवाला संघटनांनी पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून होणा-या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करता येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

अधिकृत फेरीवाल्यांचं सर्वेक्षण अद्याप पुर्ण झालं नसल्याचं न्यायालायने सांगितलं असून, नो हॉकर्स झोनमध्ये फेरीवाल्यांना बसू दिलं जाऊ नये असं सांगितलं आहे. फेरीवाल्यांना यापुढे मुंबईसह राज्यभरात त्यांच्यासाठी आखून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

महत्वाचं म्हणजे सुनावणीदरम्यान न्यायालायने रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरावर फेरीवाले बसू शकत नाही हे आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. तसंच रेल्वे पादचारी पुलांवरही फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही असं सांगितलं आहे. न्यायालयाने आदेशात सांगितलं आहे की, 'शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे. धार्मिक स्थळांच्या बाहेर मात्र केवळ पूजेचं साहित्य विकण्यासाठी बाकडी टाकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. 

1 मे 2014 पूर्वी ज्यांची नोंद फेरीवाले म्हणून करण्यात आली तेच अधिकृत फेरीवाले म्हणून मुंबईत व्यवसाय करु शकणार आहे. 2015 साली न्यायमूर्ती अभय ओक या संदर्भातला जो आदेश दिला होता, तोच आदेश मुंबई उच्च न्यायालायने कायम ठेवला आहे.

काँग्रेसचा मोर्चा सुरु होण्याआधीच मनसे कार्यकर्त्यांनी संपवला
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं दादरमध्ये आज मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच मनसे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यासोबत भिडले. मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र यामुळे काँग्रेसचा मोर्चा सुरु होण्याआधीच आटोपला.