शाब्बास पोरी... तिनं निडरपणे पोलिसांना फोन केला अन् बाप तुरुंगात गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 01:28 PM2018-07-12T13:28:40+5:302018-07-12T14:18:51+5:30

दारूड्या बापानं स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा वारंवार शारीरिक छळ केल्याची हादरवणारी घटना मुंबापुरीत घडली आहे.

Mumbai : Girl calls 1098, sends father to prison for rape | शाब्बास पोरी... तिनं निडरपणे पोलिसांना फोन केला अन् बाप तुरुंगात गेला!

शाब्बास पोरी... तिनं निडरपणे पोलिसांना फोन केला अन् बाप तुरुंगात गेला!

Next

मुंबई - बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दारूड्या बापानं स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा वारंवार शारीरिक छळ केल्याची हादरवणारी घटना मुंबापुरीत घडली आहे. मात्र, या घटनेमुळे जराही न घाबरता मोठ्या धैर्यानं मुलीनं दारूड्या बापाविरोधात तक्रार करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेतली. लहान मुलांसोबत गैरवर्तन आणि कोणत्याही प्रकारची छळवणूक होत असल्यास 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, याबाबतची माहिती शाळेतील एका लेक्चरमध्ये मुलीला मिळाली होती. शाळेत मिळालेल्या या शिकवणीतून प्रोत्सोहित झालेल्या पीडित मुलीनं स्वतःवर झालेल्या अन्यायविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आणि नराधम बापाविरोधात तक्रार केली. याप्रकरणी, विशेष न्यायालयानं बुधवारी (11जुलै) 35 वर्षीय आरोपीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाचा शिक्षा सुनावली आहे. 

पीडित मुलीनं कसा केला प्रतिकार?
2014 मध्ये, एका 11 वर्षांच्या मुलीनं घरामध्ये छळ होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईनवर केली होती. यावेळी दारूड्या वडिलांचे असलेले विवाहबाह्य संबंध, दारूच्या नशेत प्रत्येक रात्री तिला आणि तिच्या भावाला होणारी अमानुष मारहाण, घरात आई नसल्यानं दररोज भोगाव्या लागणाऱ्या यातना तिनं चाईल्ड हेल्पलाईनवर सांगितल्या. यानंतर हेल्पलाईनच्या एक महिला सामाजिक कार्यकर्त्या पीडित मुलीच्या घरी पोहोचल्या व तिच्यासोबत संवाद साधला. यावेळी घडल्या प्रकाराबाबत वडिलांसोबत बोलणी करणार असल्याचं आश्वासन देऊन त्या तेथून निघाल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलीनं चाईल्ड हेल्पलाईनकडे संपर्क साधत भावासहित तिला मारहाण झाल्याची तक्रार केली.   

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपी बापाला याबाबत विचारणा केली असता, त्यानं मुलांना मारहाण केल्याचं नाकारलं. शिवाय, मुलांचा योग्यरित्या सांभाळ करेन, असे आश्वासनही लिखित स्वरुपात दिले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रत्येक महिन्यात या मुलीची घरी जाऊन भेट घ्यायच्या. त्यावेळेस आरोपी केवळ सामाजिक कार्यकर्त्यांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करायचा आणि त्यांची पाठ वळताच मुलीचा छळ होणं सुरू व्हायचं. 

बापानंच केले लैंगिक अत्याचार 
अचानक एका दिवशी पीडित मुलीच्या घरी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. पित्यानंच तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. ती किंचाळत होती, विव्हळत होती. पण आरोपी बापाला तिची थोडीशी दया आली नाही. तिचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी त्यानं तिचं तोंड हातानं दाबलं. घडल्या प्रकारामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. ती अस्वस्थ झाली. आपल्या जन्मदात्या वडिलांकडूनच अत्याचार झाल्याचे तिनं शेजाऱ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. 

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर नराधम बापानं लैंगिक अत्याचाराचा आरोप फेटाळून लावला. शिवाय, माझ्या मुलीला सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्यावर भलते-सलते आरोप लावण्यास भाग पाडल्याचा उलट आरोप केला. तसंच विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेच्या मुलांवर खर्च करतो म्हणून माझ्या मुलीचा जळफळाट होतोय, असा खोटा दावा त्यानं न्यायालयासमोर केला. मात्र न्यायालयानं त्याचा दावा फेटाळून लावला. साक्षीदारांच्या साक्ष नोंदवत व पीडितेच्या जबाबावरुन आरोपी बापाच्या मुसक्या आवळत न्यायलायनं त्याला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली.

Web Title: Mumbai : Girl calls 1098, sends father to prison for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.