मुंबई शहरात बेकायदा मंडप नाहीत; उच्च न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:57 AM2018-09-15T03:57:42+5:302018-09-15T03:58:09+5:30

मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नसल्याचा महापालिकेचा दावा

Mumbai does not have illegal pavilions; High court information | मुंबई शहरात बेकायदा मंडप नाहीत; उच्च न्यायालयात माहिती

मुंबई शहरात बेकायदा मंडप नाहीत; उच्च न्यायालयात माहिती

Next

मुंबई : मुंबई शहरात व उपनगरात ३०० हून अधिक बेकायदा मंडप असल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. सरकारच्या या माहितीवर मुंबई महापालिकेने शुक्रवारी आक्षेप घेतला. मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नसल्याचा दावा महापालिकेने या वेळी केला.
मुंबई शहरात १३२ व उपनगरात २१७ बेकायदा मंडप असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली होती. महापालिकेने ही आकडेवारी चुकीचे असल्याचे न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाला सांगितले. ‘मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नाही. उपनगरात ७९ बेकायदा मंडप आहेत. त्यापैकी २० मंडपांवर कारवाई केली आहे आणि उर्वरित मंडपांवर लवकरच कारवाई करू,’ असे महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.
या आकडेवारीत तफावत का आहे, याचे स्पष्टीकरण राज्य सरकारला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने या वेळी दिले. सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात यावे व बेकायदा मंडपांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होती.
दरम्यान, न्यायालयाने राज्यातील उर्वरित ११ महापालिकांना बेकायदा मंडपांवर काय कारवाई केली आणि मंडप उभारल्यावर किती मंडप नियमित करण्यात आले, याची तपशिलात माहिती देण्याचे निर्देश दिले.

Web Title: Mumbai does not have illegal pavilions; High court information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.