Mumbai CST Bridge Collapse: Action will be taken soon on the officers of the municipality | Mumbai CST Bridge Collapse : पालिका अधिकाऱ्यांवर लवकरच होणार अटकेची कारवाई
Mumbai CST Bridge Collapse : पालिका अधिकाऱ्यांवर लवकरच होणार अटकेची कारवाई

मुंबई : पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी पालिका आयुक्तांनी अहवाल सादर केल्यानंतर, मुंबई पोलिसांनीही त्यानुसार कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. पालिका आयुक्तांकडून अहवाल मिळताच, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरील पुरावे तपासणीसाठी नेले आहेत.

सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच गुन्ह्यांत फेरफार करत, रेल्वेचे नाव वगळण्यात आल्याचेही समजते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात संबंधित यंत्रणा, संस्था आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत ६ जणांना प्राण गमवावे लागले, तर ३१ जण जखमी आहेत. दुर्घटनेनंतर मुंबई पोलीस प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी रेल्वे आणि पालिकेच्या अधिकाºयांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मात्र शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, पालिका आणि रेल्वे यांचा थेट उल्लेख न करता, पादचारी पुलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार असणारे व्यक्ती, अधिकारी असे नमूद केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रेल्वे आणि पालिका या दोघांचा सहभाग समोर आल्यामुळे दोघांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र सहभाग कोणाचा आहे, हे चौकशीशिवाय समोर येणार नाही. त्यामुळे ‘संबंधित व्यक्ती’ असे नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, तपासादरम्यान ज्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. त्यात ते रेल्वेचे अधिकारी असोत वा पालिकेचे. पालिकेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाला गती येईल.


Web Title: Mumbai CST Bridge Collapse: Action will be taken soon on the officers of the municipality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.