Mumbai Congress's 'Count the potholes' movement to awaken the Shiv Sena-BJP government | शिवसेना-भाजपा सरकारला जागे करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे 'या खड्डे मोजा' आंदोलन
शिवसेना-भाजपा सरकारला जागे करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे 'या खड्डे मोजा' आंदोलन

मुंबई-  शहरामध्ये सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यात खड्डे (पॉटहोल)की खड्ड्यांमध्ये रस्ते हेच आता कळत नाही. या खड्ड्यांमुळेच कल्याण येथील चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील शिवसेना-भाजपाप्रणीत महापालिका आणि महाराष्ट्र सरकार मुंबईकरांना भेडसावणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे "या खड्डे मोजा" या अनोख्या आंदोलनाचा मुंबईतील सायन येथील प्रतीक्षानगर येथून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी येथील खड्ड्यांचे फोटो काढून नंतर त्यात कमळाचे फुल टाकून ते बुजवण्यात आले. या आंदोलनाबद्दल अधिक माहिती सांगताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, मुंबईतील सर्व रहिवासी खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. मुंबईतील एकही रस्ता असा नाही, ज्यावर खड्डे नाहीत. या खड्ड्यांमुळे कल्याण येथे चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरवर्षी मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र एका रुपयाचे काम सुद्धा झालेले दिसत नाही. मग हा पैसा जातो कुठे? महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे त्याचेच हे उदाहरण आहे.

खड्ड्यांची समस्या लोकांच्या जीवावर बेतली आहे, तरीसुद्धा मुख्यमंत्री नागपूरला सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात म्हणतात की, मुंबईत आता एकही खड्डा नाही. सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत. इतका खोटेपणा. यावरून दिसून येते की त्यांना जनतेची किती कळकळ आहे. मुंबई महापालिकेचे कामचुकार आयुक्त स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये मोठ्या दिमाखात सांगतात की मुंबईत सर्वकाही ठीक चालले आहे. या दोघांना खोटे बोलताना लाज वाटायला हवी. या वक्त्यव्यासाठी मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची माफी मागायला हवी. अशा या निर्लज्ज सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही या "या खड्डे मोजा" या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. या आंदोलनाद्वारे आम्ही मुंबई मनपा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे लक्ष मुंबईतील खड्ड्यांकडे वेधत आहोत. या आंदोलना दरम्यान आम्ही मुंबई महापालिका प्रशासनाला मुंबईतील रस्ते दाखवणार आहोत. नंतर ते खड्डे बुजवणार आहोत आणि खड्डे बजावताना कमळाचे फुल सुद्धा त्या खड्ड्यामध्ये बुडवणार आहोत. तसेच मुंबईतील मनपाच्या वार्डमधील खड्ड्यांचे फोटो काढून ते त्या विभागातील पालिकेच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवण्यात येणार आहेत आणि मगच मुंबईतील सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत असे म्हणणाऱ्या मुंबई महापालिकेचे पितळ उघडे पडेल.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, गेले चार दिवस मुंबईतील जनता सलग पडणाऱ्या पावसामुळे त्रस्त झाली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. रेल्वेसेवाही विस्कळीत झालेली होती. मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. ठिकठिकाणी लोक अडकून पडले होते. मुंबईची अक्षरशः तुंबापुरी झालेली होती आणि एवढे झाले असताना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आहेत. महापालिका यावेळेस जास्त पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असे सांगून आपले हात झटकून टाकत आहे. हे चुकीचे आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महापालिका जबाबदार आहे.

पावसाळ्यात मुंबईमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलेले दिसून येते. हे दरवर्षीचे आहे. पण मला असे म्हणायचे आहे, मुंबई महापालिका पावसाळा सुरु व्हायच्या अगोदरच यावर उपाययोजना का नाही करत? मुंबईतील नालेसफाई का पूर्ण होत नाही? खड्डे का बुजवले जात नाहीत? जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेस हेच सत्तेतील शिवसेना भाजपवाले मतांसाठी जनतेच्या मागे फिरत असतात आणि आता जेव्हा हीच मुंबईकर जनता संकटात आहे. तेव्हा हे कुठेच दिसत नाहीत. हे कुठेतरी थांबायलाच हवे आणि जोपर्यंत हे थांबत नाही आणि या निर्लज्य सत्ताधाऱ्यांना धडा मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरु राहील, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

या प्रसंगी संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, मनपा विरोधी पक्ष नेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष बब्बू खान, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Web Title: Mumbai Congress's 'Count the potholes' movement to awaken the Shiv Sena-BJP government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.