राज्यातील कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 11:52 AM2018-11-22T11:52:39+5:302018-11-22T11:53:42+5:30

उच्च प्राथमिक शाळेतील कला क्रीडा कार्यानुभव या विषयांसाठी शंभर विद्यार्थ्यांची पटसंख्या असण्याची अट राज्य शासनाने शिथिल करावी, या मागणीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी आज आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे.

Mumbai : art, sports teachers protest in Azad Maidan | राज्यातील कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

राज्यातील कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

googlenewsNext

मुंबई- उच्च प्राथमिक शाळेतील कला क्रीडा कार्यानुभव या विषयांसाठी शंभर विद्यार्थ्यांची पटसंख्या असण्याची अट राज्य शासनाने शिथिल करावी, या मागणीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी आज आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. काळ्या रंगाच्या टोप्या, काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करत शिक्षकांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. अवघ्या ८००, १६०० आणि २४०० रुपये मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्र शासनाने मंजूर केलेले सात हजार रुपये मानधन देण्याची प्रमुख मागणी ही आंदोलनकर्त्या शिक्षकांनी यावेळी केली आहे. 

या संदर्भात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाचे अध्यक्ष जगदीश डांगे म्हणाले की, सर्व शिक्षकांना निश्चित स्वरूपाचे मानधन देण्याची गरज आहे. ज्या शाळांची पटसंख्या शंभर आहे, त्या शाळेतील शिक्षकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. १०१ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांवरील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनाही काही ठिकाणी ८००, काही ठिकाणी १६०० तर काही ठिकाणी २४०० रुपये मानधनावर काम करावे लागत आहे. अशा प्रकारे राज्यातील ६५०० शिक्षकांची पिळवणूक होत आहे. याउलट १५ हजारांहून अधिक शिक्षक विनामानधन गेल्या चार वर्षांपासून शाळांमध्ये काम करत आहेत.

त्यामुळे राज्य शासनाने ही जाचक अट काढून टाकत २०१८-१९/या चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व अंशकालीन निदेशकांना शिक्षक म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी संघाने केली आहे. तसेच सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

 

Web Title: Mumbai : art, sports teachers protest in Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.