Mumbai-Ahmedabad Shatabdi Express 'Cognition' | मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला ‘अनुभूती’

मुंबई : हवाई सफरीची अनुभव देणारी ‘अनुभूती’ बोगी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ३ ते ६ जून या चार दिवसांसाठी ‘अनुभूती’ बोगी शताब्दी एक्स्प्रेससह धावणार आहे. ‘अनुभूती’ बोगीसाठी १ जानेवारीपासून प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे.
लिंके-हॉफमॅन-बुश (एलएचबी) प्रकारात ‘अनुभूती’ बोगीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अनुभूती’ बोगीत ५६ आसने असणार आहेत. आरामदायी खुर्ची, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रीन, वैयक्तिक मोबाइल चार्जिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. बोगीत प्रथमच सेंसरयुक्त पाण्याचे नळ आणि बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘अनुभूती’च्या बोगींना अ‍ॅन्टी-ग्राफिटी रंग देण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक २२००९-२२०१० मुंबई-शताब्दी एक्सप्रेसला अनुभूती बोगी जोडल्याने, ही एक्सप्रेस १९ बोगींसह धावणार आहे. सद्यस्थितीत एक्स्प्रेस १८ बोगींसह धावते. बोगीचे आरक्षण आणि दर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रायोगिक तत्त्वावर ‘अनुभूती’ बोगी शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी
माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.