मुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 02:08 AM2018-04-27T02:08:59+5:302018-04-27T02:08:59+5:30

मे महिन्यात निविदा : रेल्वे बोर्डाच्या हालचाली सुरू, ६ एसी तर ६ सामान्य बोगी

Mumbai AC services soon | मुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच!

मुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच!

Next

महेश चेमटे ।
मुंबई : मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वे बोर्डाने ‘सेमी वातानुकूलित’ लोकलच्या प्रस्तावावर निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ६ वातानुकूलित बोगी आणि ६ सामान्य बोगी या मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ‘सेमी वातानुकूलित’ लोकलच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘मे’ महिन्यात सेमी वातानुकूलित लोकलच्या निविदा जाहीर करण्यासाठी बोर्डाने हालचाली सुरू केल्या आहेत.
वातानुकूलित लोकलमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे आरामदायी प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र वातानुकूलित लोकलमुळे अन्य लोकल फेऱ्यांवर गर्दीचा ताण येत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पश्चिम रेल्वे मार्गावर सेमी वातानुकूलित लोकलचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला होता.

रेल्वे बोर्डातील अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, प्रस्ताव बोर्डात दाखल झाल्यानंतर वातानुकूलित तीन बोगी की सहा बोगी करणे योग्य ठरेल, यावर चर्चा झाली. चर्चेअंती ६ बोगी वातानुकूलित आणि ६ सर्वसामान्य बोगी या निर्णयापर्यंत पोहोचलो. रेल्वे बोर्ड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) याबाबत निविदा जाहीर करेल. सध्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ‘मे’ महिन्यात निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील १२ बोगींच्या लोकल टप्प्याटप्प्याने १५ बोगींच्या करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या लोकलला नव्याने जोडण्यात येणाºया ३ बोगी या वातानुकूलित असाव्यात. यामुळे सर्व वर्गाच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री संघ


पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वातानुकूलित लोकलने पहिल्या तीन महिन्यांत तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Web Title: Mumbai AC services soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.