मुंबई : शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या तयारीला आणखी वेग आला आहे. दादर, लालबाग, गिरगाव आणि कुर्ल्यातील प्रमुख बाजारपेठा गणेशोत्सवासाठी सजू लागल्या आहेत. अनेक सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळे गणेश चतुर्थीअगोदरच मूर्तीची मंडपात प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे अशा मंडळांची मंडप बांधण्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर ज्या ठिकाणी मंडप बांधले जाणार आहेत; त्या रस्त्यांची डागडुजी करणे, खड्डे बुजवण्याची कामेही प्रगतिपथावर आहेत.
यंदा गणेशोत्सव मंडळे मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा वर्गणी मिळत नसल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले. जीएसटीचा मंडळांना मोठा फटका बसत आहे. गणेशमूर्तींपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत जवळपास सर्वच वस्तूंवर जीएसटी लागू झाला असल्याने खर्चात वाढ झाली आहे. आणि दुसºया बाजूला वर्गणी कमी मिळत आहे. त्यामुळे खर्चाचे गणित कसे मांडायचे, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला आहे, असे गणेशोत्सव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष कुंदन अगासकर यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सव मंडळांपुढे आर्थिक संकट जरी उभे ठाकले असले तरी मंडळांचा उत्साह मात्र कायम आहे. मंडळांमधील तरुण कार्यकर्ते मेहनत घेत असून उत्सव दरवर्षीप्रमाणे व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे वातावरण सर्वच मंडळांमध्ये पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव काळात राज्यासह देशभरातून लोक मुंबईला भेट देतात. गणेशोत्सवात मुंबईकर रात्रीच्या वेळी गणेशदर्शनासाठी जातात. रात्रीच्या वेळी वाहतुकीची सोय नसल्याने मुंबईकर वैयक्तिक वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यावर तोडगा म्हणून बेस्टने रात्रीच्या वेळी जादा बस चालवाव्या यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीने बेस्टच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन जादा बसची मागणी केली आहे. या मागणीला बेस्टकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला असून गणेशोत्सव काळात किती जादा बस चालविण्यात येतील? याबाबत समन्वय समिती व बेस्टकडून येत्या दोन-तीन दिवसांत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समन्वय समितीकडून देण्यात आली.