- प्रशांत शेडगे,  पनवेल
येथील मशिदींवर लावलेले भोंगे स्वत:हून काढण्याचे मशीद ट्रस्टने मान्य करून एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. त्यामुळे दिवसभरातील पाच वेळच्या नमाजाची अजान आता पूर्वीप्रमाणे शहरात सर्वदूर ऐकू जाणार नाही.
सण-उत्सव साजरे करताना, त्याबरोबरच प्रार्थना करताना ध्वनिप्रदूषण होऊ नये, अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करताना डीजे व साउंड सिस्टीमवर निर्बंध आणण्यात आले आहेत. याच संदर्भात शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सोमवारी मशीद ट्रस्टची बैठक बोलावली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, स्पीकरवरून अजान देऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मशिरीबाहेरील स्पीकरवरून अजान न देण्याचे ट्रस्टने मान्य केले. पनवेल शहरात एकूण ११ मशिदी असून, त्यात आतमध्ये स्पीकर लावण्यास मात्र कोणतीही हरकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईतही मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींनी न्यायालयाच्या या निर्णयाचा मान राखत सकाळी ६ वाजेपूर्वीच्या अजानसाठी लाऊडस्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला.

न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनीच आदर करायला हवा. शहरातील सर्व मशिदींच्या प्रमुखांनी हा निर्णय मान्य केला. पहाटेच्या दिल्या जाणाऱ्या ‘अजान’च्या वेळी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर इतर वेळी न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या पातळीबाबचे नियमही पाळण्यात येतील. - सिराज सय्यद, पनवेल

पनवेल शहर हे ऐक्याचे प्रतीक मानले जाते. मुस्लीम बांधवांना केलेल्या आवाहनाला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अनुकूल प्रतिसाद दिला आहे.
- बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.