निकृष्ट रस्त्यांवर तरतुदींचा मुलामा; ‘घोटाळे’ रोखण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 3:26am

मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य, निविदा प्रक्रियेतील गोंधळ, कंत्राटदारांवरील मेहरनजर आणि अभियंत्यांचा कंत्राटदारांवर वरदहस्त, अशा अनेक नाट्यमय घडामोडींनी मुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा गाजला.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य, निविदा प्रक्रियेतील गोंधळ, कंत्राटदारांवरील मेहरनजर आणि अभियंत्यांचा कंत्राटदारांवर वरदहस्त, अशा अनेक नाट्यमय घडामोडींनी मुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा गाजला. या प्रकरणी काही अभियंते निलंबितही झाले, तर काही कंत्राटदारांना पालिकेने घराचा रस्ता दाखविला. परिणामी, आता भविष्यात आणखी रस्ते घोटाळे होऊ नयेत, निकृष्ट रस्त्यांमुळे सर्व स्तरातून पालिकेवर होणारे आरोप थांबावेत, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, मुंबई महापालिका रस्त्यांची दुरुस्ती, रुंदी वाढविणे या कामांसह संगमस्थानांच्या सौंदर्यीकरणावरही भर देणार आहे. त्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी एकूण १हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रस्ते कामांसाठीचे साहित्यही पालिका स्वत: तयार करणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते या मुख्य पायाभूत सुविधेकरिता प्रकल्प दृष्टीकोन अंगीकारण्यात आला आहे. नव्या दृष्टीकोनानुसार रस्त्यांच्या कामांमध्ये, पदपथांसाठी तरतूद, सुधारणा, महापालिकेच्या उपयोगिता सेवा जसे की, मुख्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्य जलवाहिन्या इत्यादींसाठी आवश्यकतेनुसार तरतूद करणे, वाहतूक सुविधांची तरतूद आणि सौंदर्यीकरण याचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेकडे उपलब्ध निधीचा पुरेपूर वापर करून, अधिकाधिक रस्त्यांची सुधारणा करण्यासह वाहतुकीसाठी कमीतकमी कालावधीकरिता रस्तेबंदी करून, नागरिकांची गैरसोय कमी करणे हा पालिकेचा उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेथे शक्य आहे, तेथे मुख्य रस्ते आणि संगमस्थानांच्या काँक्रिटीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी एकूण १हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबई महापालिकेने एसव्ही रोड, एलबीएससह मुलुंड आणि भांडूप येथील रस्त्यांच्या सुधारणांवर भर दिला आहे. विशेष म्हणजे, रस्ते कामांसाठी लागणारे साहित्य आता महापालिका स्वत: तयार करणार आहे. रस्त्यांचे चर खणण्याची परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे. प्रचलित पद्धतीने परवानगी देणे बंद करण्यात आले आहे. गावठाणांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण गावठाणांची सुधारणा करण्याकरिता मुंबईतील सर्व गावठाणांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामाकरिता १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवून तत्काळ दिलासा मिळण्याकरिता, आयात केलेले साहित्य वापरण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. - साहित्याचे समाधानकारक परिणाम पाहता, महापालिकेच्या प्लँटमध्ये अशा प्रकाराचे साहित्याची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. - पावसाळ्यापूर्वी या साहित्याचे उत्पादन सुरू होईल, अशी आशा महापालिकेला आहे. - ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, रस्ते दुरुस्तीचे काम करताना ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पार्किंगमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न सुधारित वाहनतळ धोरणानुसार आता निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार स्वीकृतीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी, सरतेशेवटी वाहनांच्या पार्किंगमध्ये शिस्त येण्यास आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेला आहे. काही महत्त्वाची कामे ११० कोटी रुपयांचे वांद्रे येथून ओशिवरापर्यंत एस. व्ही. रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर २०१८ मे पर्यंत हे काम पूर्ण होईल. १६० कोटी रुपयांचे ४ मी. पदपथांचे काम, तसेच पूर्व उपनगरातील एलबीएस रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर.

संबंधित

खुल्या गटारांतून येणाऱ्या कच-यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा दूषित
पोलीस सहकार्य करत नाहीत, मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाकडे तक्रार
मुंबईतील भिकारी प्रतिबंधक कायदा रद्द होणार? दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक
शिवसेनेच्या नगरसेवकाचे सदस्यत्व अखेर रद्द, जात प्रमाणपत्र अवैध
भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, मालमत्ता करमाफीच्या प्रस्तावावरून कोंडी

मुंबई कडून आणखी

सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ  
जीवनस्तर सर्वेक्षणात मुंबईची बाजी, १११ शहरांमध्ये तिसरा क्रमांक
अत्याधुनिक कॉम्पॅक्टर : कचऱ्याची सरमिसळ नाही
निम्म्या गृहनिर्माण सोसायट्यांची पालिकेच्या नियमांना केराची टोपली
श्रींच्या आगमनापूर्वी खड्डे भरणार

आणखी वाचा