-प्रसाद गो. जोशी
खनिज तेलाच्या वाढत्या दरांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चिंता निर्माण होऊन बाजार खाली येत असतानाच मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने भारताचे रेटिंग वाढविल्याने मुंबई शेअर बाजारात शेवटचे दोन दिवस उत्साह दिसून आला. मूडीजच्या या निर्णयाने बाजाराचा मूड बदलला आणि सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये मात्र घसरण बघावयास मिळाली.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३३५२०.५२ ते ३२६८३.५९ अंशांदरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३३३४२.८० अंशांवर बंद झाला. गतसप्ताहापेक्षा त्यामध्ये २८.२४ अंशांची वाढ झाली.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही संमिश्र वातावरण दिसून आले असले तरी येथील निर्देशांक (निफ्टी) मध्ये काहीशी घसरण झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी मागील बंद निर्देशांकापेक्षा ३८.१५ अंशांनी खाली येऊन १०२८३.६० अंशांवर बंद झाला. बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही असमान परिस्थिती दिसून आली. मिडकॅप निर्देशांक ११०.६४ अंशांनी वाढला तर स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये ३८.६९ अंशांनी घट झालेली बघावयास मिळाली.
विविध आस्थापनांचे तिमाही निकाल जरी बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे येत असले तरी आयात-निर्यात व्यापारामधील तफावत वाढली आहे. आॅक्टोबर महिन्यात देशाची निर्यात कमी झाली असून, आयातीमध्ये वाढ झाल्याने या व्यापारातील समतोल आणखी ढळला आहे. मात्र परकीय व स्थानिक वित्तसंस्थांकडून खरेदीचे पाठबळ मिळाल्याचे दिसून आले.
आंतरराष्टÑीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती ही डोकेदुखी ठरत आहे. या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण दिसून आले. मात्र सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकेतील करसुधारणा विधेयकाबाबत आशा निर्माण झाल्याने वाढ झाली.
>रुपयाच्या किमतीत चार वर्षांतील सर्वाधिक वाढ
मुडीज या आंतरराष्टÑीय पतमापन संस्थेने भारताच्या रेटिंगमध्ये केलेल्या सुधारणेचा फायदा भारतीय चलन रुपयालाही मिळाला आहे. यामुळे शुक्रवारी भारतीय चलनाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चार वर्षांमधील सर्वाधिक वाढ नोंदविली आहे.
इंटरबॅँक फॉरीन एक्स्चेंज मार्केटमध्ये शुक्रवारी भारतीय चलन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १.०६ टक्क्यांनी वधारला आहे. रुपयाच्या किमतीमध्ये एका दिवसामधील ही झालेली वाढ गेल्या चार वर्षांमधील सर्वाधिक ठरली आहे.मुडीज या आंतरराष्टÑीय पतमापन संस्थेने १३ वर्षांनंतर भारताचा पतदर्जा बीएए३ वरून बीएए २ असा वाढविला आहे. या निर्णयामुळे भारताकडील परकीय गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असल्याने भारतीय चलनाचे मूल्य वाढले आहे.