मोनो रेल्वेच्या प्रवाशांना अजूनही जलद प्रवासाची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:52 AM2019-04-25T05:52:21+5:302019-04-25T05:52:32+5:30

आचारसंहितेचा फटका; नव्या गाड्यांची खरेदी रखडली

Mono rail passengers still wait for fast travel! | मोनो रेल्वेच्या प्रवाशांना अजूनही जलद प्रवासाची प्रतीक्षा!

मोनो रेल्वेच्या प्रवाशांना अजूनही जलद प्रवासाची प्रतीक्षा!

googlenewsNext

मुंबई : मोनोच्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यावरील फेऱ्यांमध्ये वाढ होण्यासाठी, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वीच निविदा काढल्या आहेत. मात्र, या नव्या मोनो सेवेत दाखल होण्यासाठी आणखी थोडा अवधी लागणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकांमुळे जाहीर झालेल्या आचारसंहितेचा फटका मोनो रेल्वेच्या खरेदीला बसला आहे. यामुळे या मार्गावर जलद प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

मोनोच्या दोन्ही टप्प्यांवर सध्या फक्त चारच मोनो धावतात. त्यातील दोन गाड्या दुुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत. यामुळे या मार्गावर २० ते २५ मिनिटांनी मोनो रेल्वे धावत आहे. मोनोची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी या दोन्ही मार्गांवर १७ गाड्यांची गरज आहे. या सर्व गाड्या नियमित सुरू झाल्यावर दर पाच मिनिटांना एक अशी मोनो धावेल, असा विश्वास प्राधिकरणाला आहे.

मोनो प्रकल्पाची कर वगळून एकूण किंमत २ हजार ४६० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकल्पाची दोन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मोनो रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक जलद करण्यासाठी प्रत्येकी ४० कोटी रुपयांच्या पाच नव्या मोनो खरेदी करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. वडाळा येथील मोनोच्या डेपोमध्ये अतिरिक्त रोलिंग स्टॉक, इंजिनाच्या सुट्या भागांच्या खरेदीस प्राधिकरणाने निविदाही काढल्या आहेत. मात्र, सध्या आचारसंहिता असल्याने खरेदी रखडली आहे.

१७ गाड्यांची आवश्यकता
जलद सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला पूरक म्हणून अतिगर्दीच्या आणि चिंचोळ्या भागात मोनो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सप्टेंबर, २००८ मध्ये घेतला. वडाळा ते चेंबूर हा ८.८० किमी. लांबीचा पहिला टप्पा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा ११.२० किमी लांबीचा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्पा २ फेब्रुवारी, २०१४ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. प्रकल्प देखभालीचे काम प्राधिकरणाने डिसेंबर, २०१८ पासून हाती घेतले आहे. या दोन्ही मार्गांवरील जलद प्रवासासाठी १७ गाड्यांची आवश्यकता आहे. 

ताशी साडेसात हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानचा मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा मार्च, २०१९ पासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला उन्नत मार्गावरून मोनो रेल्वे ताशी ३० ते ८० किलोमीटर वेगाने धावू शकते. मोनो रेल्वेची दर तासाला ७ हजार ५०० प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे

Web Title: Mono rail passengers still wait for fast travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.