मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 03:01 PM2019-04-10T15:01:41+5:302019-04-10T15:27:29+5:30

मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे

MNS workers not help to Nirupam in elections campaign | मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका

मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका

Next

मुंबई - मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांपासून संजय निरुपमचा प्रचार मनसे करणार का? या प्रश्नाला मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे. 

संजय निरुपम आणि मनसे यांच्यात उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. इतकचं नव्हे तर संजय निरुपम मुंबई अध्यक्ष असताना राज ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यातूनच संजय निरुपम यांचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलं होतं. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात मनसे माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. भाजपाला मतदान करु नका असं आवाहन करत राज्यभरात लोकांना रिमाइंडर म्हणून 10 सभा घेणार असल्याचं राज यांनी सांगितले होते. आपल्या या प्रचारसभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर झाला मात्र देशाला वाचविण्यासाठी भाजपाविरोधात प्रचार करणार अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. 

राज ठाकरे यांच्या मनसे भूमिकेचे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आलं असलं तरी भाजपाने राज ठाकरेंवर जोरदार टीका सुरु केली. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ज्यांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते लढले, राज ठाकरेंना ज्यांनी लुख्खा अशा शब्दाचा प्रयोग केला अशा संजय निरुपमचा प्रचार मनसे कार्यकर्त्यांना करावा लागणार. हा मनसे कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे असा टोला विनोद तावडे यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मिडीयात राज यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. मराठी माणसाच्या विरोधात नेहमी भूमिका घेणारे संजय निरुपम यांचा प्रचार राज ठाकरे करणार असे संदेश फिरवले जात होते. अखेर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी संजय निरुपम यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची मनसेची भूमिका नाही. निरुपम यांचा प्रचार करणार नाही हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. तशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निरुपम यांच्या मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतील इतर मतदारसंघात फिरतील असं नांदगावकरांनी स्पष्ट केलं आहे. 

Web Title: MNS workers not help to Nirupam in elections campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.