Mhada's Mumbai divisional lottery will start | म्हाडाच्या मुंबई विभागीय लॉटरीचा मुहूर्त हुकणार
म्हाडाच्या मुंबई विभागीय लॉटरीचा मुहूर्त हुकणार

मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी होणारी म्हाडाच्या मुंबई विभागाची लॉटरी आॅक्टोबरमध्ये होईल, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी याआधी जाहीर केले होते. मात्र नुकतेच म्हाडाचे अध्यक्षपद स्वीकारलेल्या उदय सामंत यांनी मुंबई विभागाच्या लॉटरीविषयी अजूनतरी काही हालचाल नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आॅक्टोबरला मंत्रीमहोदयांनी जाहीर केलेली लॉटरी निव्वळ पोकळ आश्वासनच ठरेल, हे आता नक्की झाले आहे.
म्हाडाच्या कोकण विभागाची लॉटरी नुकतीच पार पडली. या लॉटरीवेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी माध्यमांसोबत बोलताना मुंबई विभागाची उशीर झालेली लॉटरी आॅक्टोबरमध्ये होईल अशी घोषणा केली होती. तसेच या लॉटरीमध्ये तब्बल १ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होईल आणि या घरांमध्ये अत्यल्प आणि अल्प गटांसाठी जास्त प्रमाणात घरे असतील, अशी माहितीही मेहता यांनी दिली होती. त्यामुळे दिवाळीत म्हाडाच्या लॉटरीला मुहूर्त मिळेल अशी अपेक्षा मुंबईकरांना होती.
मात्र, उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंबई विभागाच्या लॉटरीबाबत अद्याप कुठलीही हालचाल दिसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
म्हाडाच्या कोणत्याही विभागाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वी म्हाडाला त्या लॉटरीची ४५ दिवस आधी जाहिरात करावी लागते. जी डेडलाइन म्हाडाने याआधीच चुकवली आहे. गणपतीच्या १० दिवसांत लॉटरीविषयी काही ठोस हालचाली होतील याबद्दल खुद्द सामंत यांनाच साशंकता आहे. त्यामुळे मुंबईकरांना परवडणाºया दरातील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार हे आता निश्चित झाले आहे.


Web Title: Mhada's Mumbai divisional lottery will start
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.