मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे शहर, उपनगरांतील ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी इच्छुकांना आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांना आता २३ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल.
निर्धारित मुदतीपर्यंत ५० हजार जणांनी नोंदणी केली होती. तर जवळपास ४८ हजार ५०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र घरांच्या किमती अधिक असल्याने गेल्या काही वर्षांतील ही नीचांकी संख्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नव्या वेळापत्रकानुसार httpps://lottary.mhada.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी २३ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदाराला नोंदीत माहितीमध्ये बदल २४ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाइन अर्ज २४ तारखेला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सादर करता येणार आहे. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी चलन निर्मिती २५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. आॅनलाइन पेमेन्ट स्वीकृती २६ आॅक्टोबरला ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. एनईएफटी/ आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा २६ तारखेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येईल. त्याशिवाय १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आलेल्या सोडतीच्या जाहिरातीमध्ये कसलाही बदल नाही.