#MeToo: Burkha-clad Tanushree Dutta reaches Oshiwara Police Station to record statement in sexual harassment case | #MeToo : नाना पाटेकरांसह चौघांवर होणार गुन्हा दाखल; बुरखा घालून तनुश्री ओशिवरा पोलीस ठाण्यात
#MeToo : नाना पाटेकरांसह चौघांवर होणार गुन्हा दाखल; बुरखा घालून तनुश्री ओशिवरा पोलीस ठाण्यात

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवरील आणखी दोघांविरोधात जबाब नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातला होता. तिच्या जबाबानंतर या चौघांवरही लवकरच संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वकील अ‍ॅड. नितीन सातपुते आणि त्यांच्या आणखी एका वकील सहकाऱ्यासह तनुश्री सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहोचली. मीडियाला टाळण्यासाठी तिने बुरखा परिधान केला होता. गेले दोन दिवस तिचा जबाब नोंदविण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. तनुश्रीने पोलीस ठाण्यात जबाब दिला. त्यात नाना पाटेकर आणि आचार्य यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग तसेच निर्माता सामी सिध्दिकी यांच्यावरही आरोप केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तनुश्रीला नानासोबत अश्लील दृश्य देण्यास सांगण्यात आले. मात्र चित्रपटाच्या मूळ करारात त्याचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. तिने या सगळ्याला नकार दिल्याने नंतर तिच्या कारवरही गुंडांमार्फत हल्ला करवला गेला, असा तनुश्रीचा दावा आहे. त्यासंदर्भात तिने ‘मी टू’ मोहिमेंतर्गत सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर हा विषय नव्याने चर्चेत आला.
‘हॉर्न ओके प्लिज’ च्या सेटवर २००८ साली नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केला होता, असा आरोप तिने केला. या प्रकरणी शनिवारी एक लेखी पत्र तिने पोलीस ठाण्यात दिले. त्याची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणा केली होती. तसेच गुरुवारी अ‍ॅड सातपुते यांनी ४० पानी पुरावा पोलीस ठाण्यात वर्ग केला.

संध्या मृदुलचाही आलोकनाथवर आरोप
अभिनेत्री संध्या मृदुल आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटातील एका महिला क्रू मेंबरने त्यांच्यावर असेच गंभीर केले आहेत. दारूच्या नशेत त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे संध्या मृदुल यांनी म्हटले.

महिलांनी योग्य फोरमवर आवाज उठवावा : रहाटकर
महिलांनी त्यांचा आवाज पोलीस ठाणे, राज्य महिला आयोग अशा योग्य फोरमवर उठवावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.

- पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या विद्यार्थिनीही ‘मी टू’मध्ये सहभागी होत त्यांना आलेले लैंगिक शोषणाचे अनुभव सोशल मीडियावरून मांडण्यास सुरुवात केली आहे.
 


Web Title: #MeToo: Burkha-clad Tanushree Dutta reaches Oshiwara Police Station to record statement in sexual harassment case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.