ठळक मुद्देशनिवारी आणि रविवारी तब्बल एक लाख ४१ हजार ६६५ रुपयांची कमाईनेरळ ते माथेरान हा मार्ग सुरु होण्यास ४ महिन्यांचा कालावधी

मुंबई : तब्बल अठरा महिन्यानंतर सुरु झालेल्या मिनी ट्रेनने अल्पावधीत मोठी कमाई केली आहे.  माथेरान ते अमन लॉज या मार्गावर ४ हजार ५८० प्रवाशांकडून २ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तर अमन लॉज ते माथेरान या मार्गावर २ लाख २९ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण या रक्कमेने पाच लाखांचा आकडा पार केला आहे. नेरळ ते माथेरान हा मार्ग सुरु होण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी ‘शॉर्ट रन’ म्हणून सुरु केलेली मिनी ट्रेन मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर घालत आहे.माथेरानमधील वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद होती. दिड वर्षांहून जास्त वेळ हा मार्ग बंद असल्याने अमानवीय पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने अमन लॉज ते माथेरान दरम्यान युद्धपातळीवर काम पूर्ण करत हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. तब्बल अठरा महिन्यानंतर सुरु झालेल्या मिनी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. शनिवारी आणि रविवारी तब्बल एक लाख ४१ हजार ६६५ रुपयांची कमाई झाली आहे. ४ व ५ नोव्हेंबरला माथेरान ते अमनलॉज मार्गावर ७३ हजार ४८५ आणि अमनलॉज ते माथेरान मार्गावर ६८ हजार २८० रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. 

अमन लॉज ते माथेरान या मार्गावर मिनी ट्रेनला स्थानिकांसह पर्यटकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. प्रवाशांच्या सुरक्षिततेची सर्व परिमाणे पूर्ण करत हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. उर्वरित मार्गदेखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असून तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

- डॉ.ए.के. सिंग , जनसंपर्क अधिकारी , मध्य रेल्वे


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.