माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस, स्कायमेटचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 06:39 AM2018-07-16T06:39:12+5:302018-07-16T06:39:27+5:30

शहर आणि उपनगराच्या तुलनेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

Matheran's highest rainfall in the country, SkyMate claims | माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस, स्कायमेटचा दावा

माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस, स्कायमेटचा दावा

Next

मुंबई- शहर आणि उपनगराच्या तुलनेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, येथील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये मागील २४ तासांत १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा देशातील सर्वाधिक पाऊस आहे, असा दावा स्कायमेटने केला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान माथेरानमध्ये ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याच्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाचे प्रमाण कमी असून, सोमवारसह मंगळवारी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईला रविवारी दिलेल्या इशाऱ्यानुसार येथे अतिवृष्टी झाली नसली, तरीदेखील प्रत्यक्षात मात्र मुंबई शहरासह उपनगरात दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलीच धडकी भरवली होती. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत होता. वेगाने पडणाºया पावसाचे प्रमाण अतिवृष्टीच्या तुलनेत कमी असल्याने सुदैवाने कोठेही पाणी साचल्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, पावसाचा वेग अधिक असल्याने रस्ते वाहतूक धिम्या गतीने होत होती.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार, मुंबई वगळता उर्वरित भागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी पावसाचा जोर अधिक होता. येथे असलेला पावसाचा जोर दुपारीही कायम राहिला, तर शहरात सकाळी पावसाचा जोर उपनगराच्या तुलनेत कमी होता. दुपारी मात्र, मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. एकंदर दुपारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच वाराही वेगाने वाहत होता. परिणामी, मुंबईकरांची तारांबळ उडाली होती.
वडाळा, दादर, बोरीवली, कांदिवली, कुर्ला, घाटकोपर, सायन, विद्याविहार, भायखळा, मरिन ड्राइव्ह, फोर्ट, कुलाबा, महालक्ष्मी, वरळी, माहिम, वांद्रे-कुर्ला संकुल, हाजीअली, चेंबूर, मुंबई सेंट्रल अशा सर्वच परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस कोसळत असतानाच शहरात २, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला.
शहरात ४, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ४, पूर्व उपनगरात ४, पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १३ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. साकीनाका संघर्षनगर येथील एसआरए इमारत क्रमांक १६ जवळ दगड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये मनुष्यहानी झाली नाही.
>अतिवृष्टीचा इशारा कायम
मुंबई : रविवारी मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली असतानाच, १६ आणि १७ जुलै रोजी मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ जुलै रोजी उत्तर कोकणात म्हणजेच, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. १६ आणि १७ जुलै रोजी मराठवाड्यात म्हणजेच, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १६ आणि १७ जुलै रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजेच, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
>पावसामुळे विमानांना विलंब
मुंबईत रविवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलादेखील बसला. कमी दृश्यमानता व खराब हवामानामुळे काही विमानांची उड्डाणे व आगमनाला विलंब झाला, तर काही विमानांना गो अराउंड करावे लागले.
रात्री ८ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण होणाºया एकूण विमानांपैकी २९० विमानांना म्हणजे ६४ टक्के विमानांना सरासरी अर्धा तास विलंब होत होता. शनिवारी एकूण विमानांपैकी २८५ म्हणजे ६६ टक्के विमानांना विलंब झाला होता.
मुंबई विमानतळावर आगमन होणाºया एकूण विमानांपैकी २५ टक्के म्हणजे ११४ विमानांना सरासरी १५ मिनिटांचा विलंब झाला. प्रवाशांना विमानतळ परिसरात येण्यासाठीदेखील पावसामुळे विलंब झाला होत होता. त्यामध्ये झालेल्या या विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

 

Web Title: Matheran's highest rainfall in the country, SkyMate claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.