युतीच्या वर्चस्वासाठी मराठी मते ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:43 AM2019-05-28T02:43:10+5:302019-05-28T02:43:28+5:30

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे वर्चस्व राहिले.

Marathi votes became crucial for the welfare of the alliance | युतीच्या वर्चस्वासाठी मराठी मते ठरली निर्णायक

युतीच्या वर्चस्वासाठी मराठी मते ठरली निर्णायक

Next

- मनोहर कुंभेजकर
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे वर्चस्व राहिले. लोकसभेची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून पुन्हा एकदा शिवसेनेचा हा मतदारसंघ बालेकिल्ला राहील. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची तर डाळच शिजली नाही. येथे सुमारे १ लाख ३५ हजार मराठी मतदार येथे असून तो कीर्तिकर यांच्या मागे यंदा भक्कमपणे उभा राहिला.
गेली १० वर्षे १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे या मतदारसंघाचे २००९ पासून प्रतिनिधित्व करतात. विधानसभा असो की लोकसभा, येथील मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. कामत व कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमधील दोन गट निरुपम यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिले. तर उत्तर भारतीय व अल्पसंख्याक मतदारांनीसुद्धा निरुपम यांना साथ दिली नाही. याउलट गेल्या १७ फेब्रुवारी रोजी भाजप व शिवसेना यांची लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आणि गेली साडेचार वर्षे भांडणारी दोन भावंडे एकत्र आली. त्यामुळे एकीकडे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवून कीर्तिकर यांना विजयी करून मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष अमित साटम, त्यांचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली. आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपची मिळालेली साथ यामुळे या निवडणुकीत कीर्तिकर यांना ५५७१९ मताधिक्य मिळताना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा त्यांना यंदा १२ हजार ९८९ जास्त मते मिळाली.
या मतदारसंघात एकूण मतदार २,७९,६१७ आहेत. या वेळी १,६८,९३६ इतके मतदान येथे झाले असून मतदानाची टक्केवारी ६०.४१ इतकी आहे. कीर्तिकर यांना १ लाख ५ हजार ७०२ (६२.५६ टक्के) मतदान झाले. तर निरुपम यांना ४९ हजार ९८३ (२९.५८ टक्के) मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेश शेट्टी यांचा प्रभाव येथे दिसला नसून त्यांना ५४७२ (३.२३ टक्के) मते मिळाली. तर एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये आमदारकी भूषावताना दुसरीकडे थेट येथून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी हे तर येथे कमालीचे निष्प्रभ ठरले. उत्तर भारतीय व अल्पसंख्याक मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना फक्त ९२४ मते मिळाली. तर नोटाची संख्या ४२९३ (२.५४ टक्के) इतकी आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून मोदी लाटेत खासदार गजानन कीर्तिकर यांना ४२,६३२ ची मोठी आघाडी येथून मिळाली होती. त्या वेळी महायुतीचे गजानन कीर्तिकर यांना ८५,३६२ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गुरुदास कामत यांना ४२,७३० इतकी मते मिळाली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी कामत यांचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे महेश मांजरेकर यांना येथून १६,४३१ इतकी मते मिळाली होती. यंदा मात्र मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातच नव्हती. संजय निरुपम आणि मनसे यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला सामावून घेण्यास निरुपम यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे मनसेची मते कीर्तिकर यांना मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा २८,९६२ मतांनी पराभव
केला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ६४,३१८ तर काँग्रेसचे भाई
जगताप यांना ५०,५४३ तर मनसेच्या संजय चित्रे यांना २६,९३४ मते मिळाली होती. वायकर यांनी जगताप यांचा १३,७७५ मतांनी पराभव केला होता.
>विधानसभेवर काय परिणाम?
युतीचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी मतांचे विभाजन होण्याची शक्यता कमीच असून येथे महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी युती तुटली होती. मात्र त्याची पुनरावृत्ती यंदा होणार नाही. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर परत तिसऱ्यांदा येथील शिवसेनेचे उमेदवार असतील.
मनसे येथून निवडणूक लढवण्याची शक्यता असून, काँग्रेसतर्फे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेही आघाडीचा घटक पक्ष होता. त्यामुळे परत विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत सामील झाल्यास त्यांना ही जागा काँग्रेस सोडेल का, हा प्रश्न आहे.

Web Title: Marathi votes became crucial for the welfare of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.