जगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:20 AM2018-04-23T02:20:32+5:302018-04-23T02:20:32+5:30

पुण्यातील सहयोगी संस्थेने मराठी साहित्याचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी, नव्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे.

Marathi literature will be opened for publishers around the world | जगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे

जगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे

Next

मुंबई : पुस्तके, ई-बुक्स आणि आता आॅडिओ बुक्स अशी विविध स्थित्यंतरे साहित्य क्षेत्राने पाहिली आहेत. मात्र, आजही मराठी साहित्य हवे तितक्या प्रमाणात सातासमुद्रापार पोहोचले नाही. त्यामुळे विविध पातळ्यांवर आजही प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘सहयोगी’ संस्थेचा सृजनशील उपक्रम लवकरच येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातल्या कुठल्याही प्रकाशकाला मराठी साहित्य अनुवादासाठी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी साहित्याची कवाडे जगभरातील प्रकाशकांसाठी खुली होणार आहेत.
पुण्यातील सहयोगी संस्थेने मराठी साहित्याचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी, नव्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशासह जगभरातील प्रकाशन संस्था, प्रकाशक, साहित्यिकांना ‘ग्लोबल’ व्यासपीठ मिळणार आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मराठी साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. या साहित्याविषयी व लेखकांविषयी सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात येईल. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून प्रकाशक आपल्या आवडीचे साहित्य निवडू शकणार आहेत. केवळ त्यासाठी संकेतस्थळाचे सभासदस्यत्व अनिवार्य असणार आहे. ते असले की, संकेतस्थळावरील सर्व माहितीचा अधिकार साहित्यिक व प्रकाशकांना असणार आहे. औपचारिक पत्राची सोय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे पत्र प्रकाशकांनी भरले असता, त्यानंतर थेट त्यांना लेखकांशी संपर्क करण्यात येणार आहे.
याविषयी माहिती देताना सहयोगी संस्थेचे संचालक योगेश नांदूरकर यांनी सांगितले की, बºयाचदा साहित्य हे उदरनिर्वाहाचे क्षेत्र नाही, असा समज आहे. त्यामुळे या क्षेत्रांकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या नव्या व्यासपीठामुळे हा समज दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही यंत्रणा पारदर्शी असणार आहे. लेखक आणि प्रकाशकांत कोणताही दुवा नसल्याने शंभर टक्के रॉयल्टी साहित्यिकाची असणार आहे. आमची संस्था केवळ ‘सहयोगी’ म्हणूनच भूमिका बजावणार आहे.

५० प्रकाशकांनी सभासदस्यत्व स्वीकारले
संकेतस्थळाचे काम सुरू असून, येत्या तीन महिन्यांत हे संकेतस्थळ सुरू होईल. मात्र, आजमितीस ५० प्रकाशक आणि ३० साहित्यिकांनी या संकेतस्थळाचे सभासदस्यत्व स्वीकारण्याची तयारी दाखविली असून, हा प्रकल्प सर्वांनाच आवडला आहे, अशी माहिती सहयोगी संस्थेचे संचालक योगेश नांदूरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. प्रकाशक वा साहित्यिकांना अनुवादाच्या प्रक्रियेदरम्यान संवादासाठी संस्थेची गरज भासल्यास तशीही तरतूद असणार आहे.

Web Title: Marathi literature will be opened for publishers around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी